सातारा येथील छत्रपती शिवाजीमहाराज वस्तुसंग्रहालयाच्या इमारत बांधणीस शासनाने आठ कोटी रुपयांवर निधीस मान्यता दिली आहे. मात्र वाळू उपलब्ध नसल्याने सध्या बांधकाम रखडले आहे. एकूण ६० हजार चौरस फुटांचे हे काम मार्चपर्यंत पूर्ण करणार असे बांधकाम ठेकेदार सांगत आहेत.
साताऱ्यातील ऐतिहासिक वसा जपण्याचे काम छत्रपती शिवाजी संग्रहालय करणार असून, अपुऱ्या जागेअभावी एसटी स्टँडशेजारी हजेरी माळावर जागा घेऊन संग्रहालय भव्यदिव्य बांधण्याची योजना २००७ साली आखण्यात आली. पण सरकारच्या ढिसाळ धोरणाचा फटका त्यास बसला असून बांधकामाची गती रखडली आहे. आजमितीस कामाचा निधी मंजूर असतानाही काम पूर्णपणे बंद आहे. वाळू नसल्याने बांधकाम होत नाही व काम पूर्णत्वास जात नाही हे वास्तव आता जनतेसमोर आले आहे. वस्तुसंग्रहालयास एकूण ८ कोटी ३७ हजार ३८२ रुपये निधी मंजूर झाला आहे. पाìकग सोडून दोनमजली भव्य बांधकाम करण्यात आले असून, प्रत्येक मजला हा २ हजार ५०० स्क्वे. फूट असून १० हजार स्क्वे. फूट पाìकग आहे. संग्रहालयाची इमारत किल्ल्याच्या प्रतिकृतीची असून त्यास चार बुरूज आहेत. पण सध्या केवळ वाळू नसल्याने प्लॅस्टरचे काम राहिलेले आहे. या बांधकामाचा ठेका एका खासगी कंपनीला देण्यात आला असून, अंतर्गत सजावटीचे कामही खासगी कंपनीकडे देण्यात आलेले आहे. फरशी, काचा, दरवाजे, ग्रील आणि रंगकाम अपूर्ण आहेत. मध्यंतरी ठेकेदारांनी शासनाला जप्त केलेली वाळू योग्य ती रक्कम भरून बांधकामास वापरण्याची परवानगी द्यावी ही विनंती केली होती. मात्र प्रशासनाने नकार देत कामकाज बंद ठेवावे लागले तरी चालेल, जप्त केलेली वाळू मिळणार नाही असा पवित्रा घेतला. त्यामुळे निधी हातात, मात्र वाळू अजून पात्रात ही स्थिती आहे. जर वाळूचा साठा उपलब्ध झाला तर मार्चअखेर कामकाज होऊ शकते असे तेथील अभियंत्यांचे म्हणणे आहे.