उरण तालुक्यात वाढत्या औद्यागिकीकरणामुळे येथील पाळीव जनावरांचा जागेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांना ठेवण्यासाठी जागा नसल्यानेही जनावरांना रस्त्यावरच ठाण मांडले आहे. त्यामुळे वाहतूक कोंडाचा प्रश्न निर्माण झाला असून ही जनावरे भरधाव वाहनांच्या खाली चिरडली जात असल्याने त्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला आहे.
शेतकऱ्यांचे मित्र म्हणून गाय व बैलाकडे पाहिले जाते, या दोन्ही जनावरांवर शेतकरी आपल्या मुलांसारखे प्रेम करतात. उरण तालुक्यात औद्योगिकीकरणाचा विकास होत असून अनेक जमीन त्यासाठी संपादित झाल्या आहेत. त्यामुळे सध्या शेतीसाठी जमीन नसल्याने व गावात जनावरे ठेवण्यासाठी जागाच उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना आपली जनावरे मोकाट सोडलेली आहेत. यापैकी अनेक जनावरे गवत, पेंढा खात गावात भटकत आहेत. पावसाळ्यात ही जनावरे रस्त्यावरच ठाण मांडू लागल्याने रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अपघात घडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. उरण तालुक्यात गोधन वाचविण्यासाठी पुढे येणाऱ्यांची वानवा असल्यामुळे उरण-पनवेल राज्य मार्ग तसेच राष्ट्रीय महामार्ग ४ ब वरील अवजड वाहनांच्या धडकेत जनावरे मरण्याची संख्या वाढली आहे. यापैकी अनेक जनावरे शहरातही आढळत असून त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. शहरातील व्यापारी तसेच भाजी विक्रेत्यांनाही या जनावरांचा त्रास होत आहे. या जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी शहर व तालुक्यात पांजरपोळची व्यवस्था करण्यात येते. परंतु ते असूनही बंद असल्याने ही जनावरे मोकाट सुटली आहेत. या संदर्भात उरण नगरपालिकेचे मुख्याधिकारी विनोद डवले यांच्याशी संपर्क साधला असता उरण शहरात असलेल्या कोंडवाडय़ाचे कंत्राट एका सामाजिक संस्थेला देण्यात आले असून शहरातील मोकाट गुरे या ठिकाणी ठेवली जात असल्याची माहिती त्यांनी दिली.