सुमारे दोन लाख रुपयांच्या शिलकी अर्थसंकल्पास आज झालेल्या पालिकेच्या सभेत मंजुरी देण्यात आली. मालमत्ता करात मोठी कपात करतानाच कोणताही कर वाढविण्यात न आल्याने महागाईत होरपळणा-या जनतेला दिलासा देणारा अर्थसंकल्प असल्याची भावना व्यक्त केली गेली.
नगराध्यक्ष दिलीप पुंड यांच्या अध्यक्षतेखाली पालिकेची आज अर्थसंकल्पीय सभा झाली. उपनगराध्यक्ष विवेक कासार, विरोधी पक्षनेते राधावल्लभ कासट, माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, गोरख कुट, कैलास वाकचौरे, मुख्याधिकारी श्रीनिवास कुरे यांच्यासह सर्व नगरसेवक सभेस उपस्थित होते. या वर्षीच्या अर्थसंकल्पातून कोणताही नवीन कर लादण्यात आला नसल्याचे स्पष्ट झाल्याने फारशी चर्चा रंगली नाही.
क्रीडा संकुलात अलीकडेच झालेल्या क्रिकेट स्पर्धेची भाडेवसुली अद्याप झाली नाही, बांधकाम परवाना देताना जाणीवपूर्वक अडवणूक केली जाते, कर्मचा-यांचा निधी अन्यत्र वळविला जातो या मुद्यांवरून विरोधी नगरसेवकांनी मुख्याधिक-यांना जाब विचारला. घरगुती मालमत्तेवर पूर्वी असलेला साठ रुपये दर कमी करून वीस रुपयांवर तसेच व्यापारी वापराच्या मालमत्तेवरील कर सहाशेवरून दोनशे रुपयांवर आणण्यात आल्याने सर्व जनता खूश राहील याची काळजी निवडणुकीच्या तोंडावर घेतली गेल्याचे मानण्यात येते. असे असले तरी जनतेवरील मोठा कराचा बोजा कमी होणार आहे. पालिकेच्या क्रीडा संकुलाचे भाडेही दहा हजारांहून पाच हजारांवर आणल्याने क्रीडाप्रेमी खूश झाले आहेत. याशिवाय मालमत्ता करातील कपातीमुळे व्यापारीवर्गही आनंदला आहे. एकूण दोन लाख ८९१ रुपयांच्या शिलकी अर्थसंकल्पास आज मान्यता देण्यात आली.