News Flash

स्वा. सावरकर मंडईत प्रसाधनगृहच नाही

पालिका निवडणुकीत आपल्या हातून निसटलेला दादरचा गड पुन्हा मिळविण्यासाठी आतुर असलेली शिवसेना आणि ताब्यात आलेल्या गडावर अधिराज्य गाजविण्यात

| December 4, 2013 09:27 am

पालिका निवडणुकीत आपल्या हातून निसटलेला दादरचा गड पुन्हा मिळविण्यासाठी आतुर असलेली शिवसेना आणि ताब्यात आलेल्या गडावर अधिराज्य गाजविण्यात मश्गुल असलेली मनसे याच परिसरातील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडईमधील धोकादायक प्रसाधनगृहाची पुनर्बाधणी सोडाच; त्याची साधी दुरुस्तीही करू शकलेले नाहीत. परिणामी या मंडईमधील मासळी विक्रेत्या महिला, फळ-भाजीपाल्याचे विक्रेते आणि ग्राहक यांची कुचंबणा होत आहे.
दादर (पश्चिम) परिसरातील रहिवाशांची आवश्यकता लक्षात घेऊन महापालिकेने १९३५ मध्ये डिसिल्वा रोड आणि रानडे रोड यांच्या मध्ये ही मंडई बांधली. या मंडईत मासळी, भाज्या, फळे, गरम मसाले आदींचे २५० गाळे आहेत. एवढय़ा साऱ्यांसाठी एकच शौचालय आहे. २५० गाळेधारक, तेथील कर्मचारी आणि खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांपैकी काही मंडळी या प्रसाधनगृहाचा वापर करतात. मंडईतील प्रसाधनगृह ‘स्वातंत्र्यवीर सावरकर मित्र मंडळा’ला चालविण्यासाठी देण्यात आले होते. मात्र देखभालीकडे दुर्लक्ष झाल्याने प्रसाधनगृह धोकादायक बनले. परिणामी आजही विक्रेते आणि ग्राहकांची प्रचंड कुचंबणा होत आहे. प्रसाधनगृहाची देखभाल करणारी मंडळी शिवसेनेशी संबंधित असूनही पालिका अधिकाऱ्यांकडून या मंडईची दुरुस्ती करून घेता आली नाही. अखेर काही गाळेधारकांनी मनसेकडे धाव घेतली. मनसेचे नगरसेवक सुधीर जाधव यांनी पालिका अधिकाऱ्यांच्या पाठी लागून मंडईच्या बाहेर एक मोबाइल शौचालय उभे केले. मात्र काही दिवसांनी हे मोबाइल शौचालयही गायब झाले. आता काही गाळेधारकांनी एकत्र येऊन हे प्रसाधनगृह आपल्याला चालविण्यास द्यावे, अशी मागणी पालिकेकडे केली आहे. परंतु त्यावर कोणताही निर्णय न घेता पालिका अधिकारी थंड बसून राहिले आहेत.
मुंबईतील धोकादायक मंडयांच्या दुरुस्तीची कामे पालिकेने हाती घेतली. तशी ती या मंडईचीही करण्यात आली. सुमारे २.५ कोटी रुपये खर्च करून दुरुस्ती करण्यात आली. पण धोकादायक प्रसाधनगृहाकडे मात्र पालिका अधिकाऱ्यांचे लक्षच गेले नाही. पालिकेच्या २०१३-१४ च्या अर्थसंकल्पातही मंडयांच्या दुरुस्तीसाठी ६१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र या मंडईतील प्रसाधनगृहाच्या दुरुस्तीसाठी प्रशासनाला २० लाख रुपये खर्च करता आलेले नाहीत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 4, 2013 9:27 am

Web Title: no toilet in savarkar market
Next Stories
1 ‘जादूटोणाविरोधी कायदा हिवाळी अधिवेशनातच व्हावा’
2 गर्दीतल्या महिलांची कहाणी
3 ‘गुगल अर्थ’ला स्पर्धा इस्रोच्या ‘भुवन’ची
Just Now!
X