सर्वोच्च न्यायालयाचे र्निबध आणि ठाणे पोलीस कारवाई करतील या धसक्यामुळे ठाण्यातील बऱ्याच मंडळांनी रस्ते अडवून उत्सव साजरा करण्याची आपली हौस यंदा आवरती घेतल्यामुळे ठाणेकरांनी सोमवारी सुटकेचा श्वास घेतल्याचे चित्र प्रमुख चौकांमध्ये पाहावयास मिळाले. पाचपाखाडी येथे जितेंद्र आव्हाड, टेंभी नाक्यावर एकनाथ िशदे, जांभळी नाक्यावर राजन विचारे. रहेजा चौकात रवींद्र फाटक अशा काही नेत्यांनी यंदाही चौक, रस्ते अडवून उत्सव साजरा करण्याची ‘परंपरा’ कायम ठेवली. मात्र, गोखले मार्ग, हरिनिवास, कामगार मार्गअशा काही महत्त्वाच्या मार्गावर यंदा दहीहंडय़ा उभारल्या गेल्या नाहीत. त्यामुळे एरवी वाहतूक कोंडीचे आगार ठरणारे हे मार्ग प्रवाशांसाठी खुले होते.  
ठाणे रेल्वे स्थानक परिसरात ये-जा करण्यासाठी हमरस्ता म्हणून ओळखला जाणारा गोखले मार्गासह नौपाडा, वागळे, घोडबंदर परिसरातील रस्ते मोकळे असल्यामुळे वाहतूक व्यवस्था सुरळीतपणे सुरू होती. विशेष म्हणजे, गोविंदा पथकांच्या वाहनांनी शहरात प्रवेश करू नये, यासाठी तीन हात नाका, नितीन कंपनी आणि कॅडबरी नाका या प्रवेशद्वारावरच वाहतूक पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता. त्यामुळे रिक्षा तसेच खासगी वाहने वगळता अन्य वाहनांना शहरात प्रवेश बंदी लागू करण्यात आली होती. विशेष म्हणजे, शहरात काही ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडी उत्सवांकडे गोविंदा पथकांनी पाठ फिरवल्याने हे उत्सव ओस पडल्याचे चित्रही दिसत होते. ठाणे शहरात न्यायालयाचे नियम धाब्यावर बसवून दहीहंडी उत्सव साजरा करण्याची प्रथा गेल्या काही वर्षांपासून रूढ झाली आहे.  दहीहंडी उत्सवानिमित्ताने रस्ते आणि चौक अडविणे, डीजेचा दणदणाट आणि रस्त्यावरून पायी जाणारे गोविंदा पथकांचे जथ्थे असे काहीसे चित्र दरवर्षी ठाणेकरांना पाहावयास मिळते. उंच-उंच थर आणि मोठय़ा रकमेच्या बक्षिसांमुळे शहरातील आयोजकांमध्ये जीवघेणी स्पर्धा सुरू झाली होती. असे असतानाच या उत्सवासाठी सर्वोच्च न्यायालयाने र्निबध लागू केल्याने आयोजकांचे धाबे दणाणले, तसेच गेल्या काही वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयाने आखून दिलेल्या आवाजाच्या पातळीची मर्यादा ओलांडणाऱ्या मंडळंना यंदा ठाण्याचे सह पोलीस आयुक्त व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांनी कारवाईचा इशारा दिला. त्यामुळे धास्तावलेल्या अनेक आयोजकांनी यंदा दहीहंडी उत्सव रद्द केल्याचे चित्र पाहावयास मिळाले.
रस्ते, चौक रिकामे
आयोजकांच्या या भूमिकेमुळे यंदा शहरातील बहुतेक मुख्य चौक आणि रस्ते मोकळे असल्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीतपणे सुरू होती. गोविंदा पथकांची वाहने शहरात शिरू नयेत, यासाठी तीनहात नाका, नितीन कंपनी आणि कॅडबरी नाक्यावरील शहराच्या प्रवेशद्वारावर वाहतूक पोलिसांनी नाकाबंदी केली होती. गोविंदा पथकांची वाहने मुंबई-नाशिक महामार्गालगत असलेल्या सेवा रस्त्यांवर उभी करण्यासाठी व्यवस्था करून देण्यात आली होती. मात्र, या वाहतूकीचे नियोजन करताना वाहतूक पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे चित्र दिसून आले. गेल्या वर्षी डीजेच्या दणदणाटामुळे वादग्रस्त आणि नौपाडा पोलिसांसाठी डोकेदुखी ठरलेला शहराची मुख्य वाहिनी असलेल्या गोखले मार्गावरील चौकातील दहीहंडी उत्सव यंदा आयोजकांनी रद्द केल्यामुळे या चौकातील वाहतूक सुरळीतपणे सुरू होती. तसेच दरवर्षी दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने येथे डीजेच्या दणदणाटामुळे होणारे ध्वनिप्रदूषण आणि गोविंदा पथकांमुळे गर्दीमुळे होणारी वाहतूक कोंडी, यातून सुटका झाल्याचे चित्र दिसून आले.
गोविंदा पथके रोडावली
दरवर्षी दहीहंडी उत्सवानिमित्ताने शहरातील रस्ते अडवून वाहतूक कोंडीला आमंत्रण देणारे आणि डीजेच्या दणदणाटाने ध्वनिप्रदूषण करणाऱ्या आयोजकांपाठोपाठ यंदा गोविंदा पथकांची संख्याही रोडावल्याचे चित्र दिसून आले. दरवर्षी गोविंदा पथकांचे जथ्थेच्या जथ्थे रस्त्यावरून पायी जाताना दिसायचे आणि शहरातील दहीहंडी उत्सवाच्या ठिकाणीही गोविंदा पथकांची मोठी गर्दी असायची. मात्र, यंदा गोविंदा पथकांचे जथ्थे रस्त्यावर पायी जाताना दिसत असले तरी दरवर्षीच्या तुलनेत यंदा गोविंदांचे प्रमाण कमीच होते. यापूर्वी दहीहंडी उत्सवाच्या ठिकाणी जाण्यासाठी प्रवेशद्वारापासूनच गोविंदा पथकांच्या जथ्थ्यांमधून वाट शोधावी लागत होती. मात्र, यंदा सहजपणे दहीहंडीच्या ठिकाणी जाता येत होते.