गिरणी कामगारांसाठी ‘म्हाडा’ने घरे बांधली..पैशाची तजवीज झाल्यावर लोक या उंच इमल्यांत राहायलाही आले..पण या दिमाखदार संकुलातही चाळीप्रमाणेच पाण्याचे हाल सुरूच राहिल्याचा अनुभव काळा चौकी भागात गिरणी कामगारांसाठी बांधण्यात आलेल्या वसाहतीमधील रहिवाशांना येत आहे. विशेष म्हणजे चार हजारपैकी अवघी दोन हजार बिऱ्हाडे राहत असताना ही अवस्था असेल तर सर्व घरांमध्ये लोक राहायला आले की काय गोंधळ उडेल असा सवाल उपस्थित होत आहे.
काळाचौकी भागात गिरणी कामगारांसाठी बांधण्यात आलेल्या इमारतींची वसाहत आहे. या ठिकाणी २२ ते २५ मजल्यांच्या जवळपास १६ इमारती आहेत. त्यात सुमारे चार हजार घरे आहेत. एका मजल्यावर प्रत्येकी २२५ चौरस फुटांची दहा ते १२ घरे अशी रचना आहे. बऱ्याच प्रतीक्षेनंतर मागच्या वर्षी सोडतीत यशस्वी ठरलेल्या यशस्वी गिरणी कामगारांना-त्यांच्या वारसदारांना घराचा प्रत्यक्ष ताबा मिळण्यास सुरुवात झाली. या वसाहतीमधील सुमारे चार हजार घरांपैकी निम्म्या घरांचा ताबा दिला गेला आहे. जवळपास दोन हजार कुटुंब हळूहळू या वसाहतीत राहण्यासाठी आली आहेत.
इमारतीच्या खाली पाण्याची साठवण टाकी, वरती टाकी अशारितीने चार हजार कुटुंबांच्या वसाहतीला पुरेल अशारितीने पाण्यासाठी साठवण टाक्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. पण गेल्या कित्येक महिन्यांपासून पालिकेकडून होणारा पुरवठा नाममात्र आहे. पालिकेकडून अवघे अर्धा तास पाणी येते. सर्वाना पाणी पुरायचे तर निदान दोन तास पाणी येणे अपेक्षित आहे. पण अर्धाच तास पाणी येत असल्याने ते पाणी अपुरे पडते. पाणी अचानक जात असल्याने काहीवेळा रहिवाशांकडून पाण्याचा नळ उघडा राहतो. परिणामी नंतर पाणी आल्यावर घरात कोणी नसल्यास वाया जाते. त्यामुळे चाळींमधून छान उंच इमारतीमध्ये आल्यावर पाण्यासारख्या रोजच्या कटकटी दूर होतील ही रहिवाशांची अपेक्षा फोल ठरली आहे. पाण्याचा ठणठणाट असल्याने रहिवासी ‘म्हाडा’कडे तगादा लावत आहेत. ‘म्हाडा’कडे विचारणा केली असता ते पालिकेकडे बोट दाखवतात. मधल्या मध्ये रहिवाशांचे पाण्यावाचून हाल होत आहेत.
या अपुऱ्या पाण्याचे आता राजकारणही सुरू झाले आहे. पाण्याची ओरड आहे असे समजताच काही स्थानिक राजकीय नेत्या-कार्यकर्त्यांनी आम्ही तुमचा प्रश्न सोडवतो म्हणून रहिवाशांना सांगितले. नंतर काही दिवस पाणी नीट आले. त्यावर लगेचच ‘आमच्या प्रयत्नांमुळे पाण्याचा प्रश्न सुटला’ असे श्रेय घेणारे फलकही झळकवण्यात आल्याचे एकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.