* नागझरीने भागवली ‘सिंगापूर’ची तहान
 * नळातून वाहते झऱ्याचे पाणी

पावसाळा सोडून उर्वरित आठ-दहा महिने डोक्यावर पाण्याच्या घागरी घेऊन डोंगर चढण्याचा द्रविडी प्राणायाम कराव्या लागणाऱ्या मुरबाड तालुक्यातील आदिवासींची तहान नाणेघाट परिसरातील डोंगरातून बारमाही वाहणाऱ्या नागझरीने भागवली आहे. कारण आता झऱ्यावर राबविण्यात आलेल्या पाणी योजनेमुळे मुरबाड तालुक्यातील सिंगापूर गावात चक्क नळाचे अहोरात्र पाणी उपलब्ध झाले आहे.
नाणेघाटाच्या पायथ्याशी असणाऱ्या सिंगापूर या शंभर टक्के आदिवासी वस्ती असणाऱ्या गावात काटय़ाची वाडी, सावळ्याची वाडी, टेंभाची वाडी, शेंडेवाडी, डोक्याची वाडी, कोळ्याची वाडी, इस्टय़ाची वाडी आणि वाघाची वाडी अशा आठ वाडय़ा असून सुमारे एक हजारहून अधिक लोकसंख्या आहे. गेल्या वर्षी डोंगरमाथ्यावरून वाहणाऱ्या नागझरी या बारमाही झऱ्यावर राबविण्यात आलेल्या पाणी योजनेमुळे गावातील काही भागाचा पाणी प्रश्न मिटला आहे.या योजनेत डोंगरावरील नागझरीचे पाणी पाईपाद्वारे दोन किलोमिटर खाली आणून १२ हजार लिटर्सच्या एका टाकीत साठविले जाते. या टाकीतून गावात चार नळांद्वारे पाणी पुरविले जाते. गेल्या वर्षी मे महिन्यात ही योजना कार्यान्वीत झाली आणि येथील रहिवाशांचे आयुष्यच बदलले. डोंगर माथ्यावरून गुरूत्त्वाकर्षणाने हे पाणी टाकीत येते. त्यामुळे विजेशिवाय थेट गावात पाणी पुरवठा होतो. झऱ्याचे पाणी चवीला अतिशय गोड आणि थंड आहे. सध्या गावातील एका पाडय़ाचा पाणी प्रश्न या योजनेमुळे मिटलाच, शिवाय  बरेच पाणी वाहून जात आहे. सध्या हे वाया जाणारे पाणी शेता-वावरातील वाल-हरबऱ्याला दिले जात आहे. मात्र लवकरच विस्तारीत योजनेद्वारे दुसऱ्या वस्तीलाही पाणी पुरविण्यात येणार आहे. याच परिसरात असाच आणखी एक बारमाही वाहणारा झरा (जाळीचा झरा) असून तिथेही लवकरच अशीच योजना राबविण्यात येणार आहे. त्यामुळे सिंगापूर गावाची पाण्याची समस्या बऱ्याच प्रमाणात मिटेल, असा विश्वास जिल्हा परिषदेचे उप कार्यकारी अभियंता एम़ ए. लंबाते यांनी व्यक्त केला आहे.                                    
ल्ल  कमी खर्च- शून्य देखभाल
शासनाच्या भुजल सर्वेक्षण विभागाने केलेल्या सर्वेक्षणानुसार बारमाही वाहणाऱ्या झऱ्यांवरच ही योजना राबविता येते. नागझरी येथे राबविण्यात आलेली ठाणे जिल्ह्य़ातील ही पहिलीच शासकीय योजना आहे. स्थानिक आमदार किसन कथोरे यांनी त्यासाठी पुढाकार घेतला.  ९ लाख ३५ हजार रूपयांची ही योजना पूर्णत्त्वास येण्यासाठी तीन महिन्याचा कालावधी लागला. ऐन मे महिन्यात जेव्हा सगळीकडे पाण्याचे दुर्भिक्ष्य असते, त्यावेळी हे झऱ्याचे पाणी गावात नळाद्वारे आले. अतिशय कमी खर्चाच्या या योजनेचे वैशिष्टय़ म्हणजे तिचा देखभाल खर्च जवळपास शून्य आहे. या भागातील अनेक पाणी योजना देखभाल दुरूस्ती अभावी किंवा ग्रामपंचायतीने विजेचे बिल न भरल्याने बंद आहेत. या पाश्र्वभूमीवर ही योजना महत्त्वपूर्ण आहे.

ल्ल  डोंगराळ वस्त्यांना झरे वरदान
डोंगराळ भागातील रहिवासी बऱ्याचदा पायथ्यावरून पाणी वाहून आणतात. खरेतर डोंगरातील झरेच त्यांच्यासाठी वरदान ठरू शकतील, असा विश्वास गेली अनेक वर्षे ठाणे आणि रायगड जिल्ह्य़ात झरे बांधणी प्रकल्प राबविणारे जलतज्ज्ञ विलास पारावे यांनी व्यक्त केला आहे. मात्र त्यासाठी डोंगरावर जंगल असायला हवे, असेही त्यांनी सांगितले. पालघर तालुक्यात मेंढवण येथे अशाच प्रकारे झऱ्यावर योजना राबवली असून तिथूनही स्थानिक लोकांना बारमाही पाणी उपलब्ध झाले असल्याची माहितीही पारावे यांनी दिली.