राज्यात मुंबई महानगरपालिकेनंतर स्वत:चे धरण असणाऱ्या नवी मुंबई पालिकेच्या खालापूर येथील मोरबे धरणात आणखी चार महिने पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक आहे. मुबलक पाण्यामुळे शहरात पाण्याच्या गैरवापराचे प्रमाणही मोठे असल्याने यंदा पाणी वापरा, पण जरा जपून असे सांगण्याची वेळ पालिका प्रशासनावर आली आहे.  जेमतेम १४ लाख लोकसंख्या असणाऱ्या नवी मुंबईला मोरबे धरणातील ४५० दशलक्ष लिटर पाण्याची हमी असल्याने शहर पाण्याबाबत श्रीमंत आणि तेवढेच बेफिकीर आहे.
राज्यात पावसाने संपूर्ण जून महिना दडी मारल्याने दृष्काळसदृश स्थिती निर्माण होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे राज्य सरकारने शिल्लक पाणी केवळ पिण्यासाठी वापरण्याचे आदेश दिले असून पाणी जपून वापरण्याचा सल्ला जनतेला दिला आहे. मात्र नवी मुंबईकर या सल्ल्याची कितपत अंमलबजावणी करतील हा संशोधनाचा विषय आहे. राज्यातील धरणात केवळ २६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. या वर्षी पाऊस कमी पडणार असल्याचा वेधशाळेचा अंदाज आहे. जून महिना कोरडा गेल्याने सर्वाच्या मनात धडकी भरली आहे. नवी मुंबई पालिकेने जून २००० मध्ये खालापूर तालुक्यातील जीवन प्राधिकरणाने अर्धवट सोडलेले धावरी नदीवरील धरण ४५० कोटीला विकत घेतले आहे. त्यामुळे शहर पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाले आहे. याउलट धरणातून दररोज मिळणाऱ्या ४१५ दशलक्ष लिटर पाण्यापैकी ३७ व ३ दशलक्ष लिटर पाणी अनुक्रमे सिडको व एमआयडीसी भागाला दिले जात आहे. मोरबे धरणातून येणारे १०० टक्के पाणी पालिका वापरत नसून एमआयडीसीच्या बारवी धरणातून येणारे ५५ दशलक्ष लिटर पाणी झोपडपट्टी व एमआयडीसी भागातील गावांना दिले जात आहे. असा दोन्ही बाजूंनी पाण्याचा मुबलक पुरवठा होत असल्याने नवी मुंबईकर पाण्याच्या बाबतीत बेदरकार असल्याचे अनेक वेळा आढळून आले आहे. त्यामुळेच उद्यान, दुभाजक येथील झाडांना कूपनलिकांचे किंवा सांडपाण्यावर प्रक्रिया केलेले पाणी न वापरता पिण्याच्या पाण्याच्या वाहिन्या टाकण्यात आलेल्या आहेत. रस्त्यावरील या पाण्याला कोणी वाली नसल्याने या पाण्याचा सर्रासपणे गैरवापर केला जात असून गाडय़ा धुणे, झाडांना आवश्यक नसताना धो धो पाण्याचा फवारा मारणे, गॅलऱ्या, जिने धुणे असे प्रकार पदोपदी दिसून येतात. पाण्याच्या या गैरवापरावर लक्ष ठेवण्यासाठी पालिकेकडे सक्षम यंत्रणा नाही. अशा सर्व गैरप्रकारावर लक्ष ठेवण्यासाठी पथक नेमण्याचे आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांच्या मनात आहे पण ते प्रत्यक्षात कधी येणार याबाबत साशंकता आहे. त्यामुळे सध्याच्या पाण्याच्या गैरवापराला रोखणारे कोणी नसल्याने नवी मुंबईकरांना पाण्याची किंमत नसल्याचे दिसून येते. शहरात कामानिमित्ताने ये-जा करणारे दोन लाख नागरिक आहेत. शहर ९८ टक्के सुशिक्षित असूनही कामावर जाणाऱ्या अनेक नवी मुंबईकरांच्या घरातील नळ खुले असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे पाणी मुबलक असले तरी पाणी जरा जपून वापरण्याचा सल्ला कार्यकारी अभियंता अविनाश शिंदे यांनी शहरवासीयांना दिला आहे. मोरबे धरण परिसरात पाऊस पडण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे या भागात १५० मिमी पाऊस सतत वीस दिवस पडला तरी धरण भरून वाहत असल्याचा अनुभव आहे. त्यामुळे पालिका निश्िंचत आहे. शिल्लक तीन महिन्यांत आवश्यक पाऊस या भागात पडण्याची खात्री आहे. धरण मोठे आणि शहर छोटे असल्याने पाण्याची टंचाई जाणवत नाही पण त्यामुळे पाण्याचा गैरवापर मोठय़ा प्रमाणात वाढला आहे. त्याला कोणाचा पायबंद नाही. त्यामुळे धरणात मुबलक पाणीसाठा असला तरी नागरिकांना पाण्याची किंमत कळावी यासाठी दहा ते पंधरा टक्के पाणीकपात लागू करण्यात यावी, असा एक मतप्रवाह आहे.