हिंदू संस्कृतीप्रमाणे कार्तिक शुद्ध षष्ठीच्या दिवशी सूयरेपासना अर्थात छटपूजा गोदाकाठावर उत्साहात साजरी झाली. जिल्ह्यातील हजारोंहून अधिक उत्तर भारतीयांनी या निमित्त गोदा काठावर गर्दी केल्यामुळे परिसरात जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. छटपूजेमुळे रामकुंड परिसर व गोदा पात्रात साचलेले निर्माल्य व अन्य साहित्य उचलण्यासाठी गुरुवारी या कार्यक्रमाचे आयोजक तसेच कार्यकर्त्यांनी पहाटे स्वयंस्फूर्तीने स्वच्छता अभियान राबविले. या अभियानामुळे एरवी निर्माल्य व पूजा साहित्यामुळे गोदापात्र व परिसरात होणारी अस्वच्छता दूर होण्यास मदत झाली. उत्तर भारतीयांनी दाखविलेले शहाणपण नाशिककरांना कधी सूचणार असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
हिंदी भाषिकांमध्ये छटपूजेला विशेष महत्त्व आहे. गोदावरीला गंगासमान मानत हिंदी भाषिकांनी गोदातीरावर छटपूजा साजरी केली.  या निमित्त हिंदी भाषिक सुपात अननस, नारळ, केळी, दूध, दही, ओंब्या, मुळा, पेटता दिवा असे साहित्य सोबत घेत सूर्याला अघ्र्य देतात आणि सोबत आणलेले गोड खाद्य नैवेद्य म्हणून दाखवितात असा प्रघात आहे. पूजा काळात हा नैवेद्य आणि अर्चनेसाठी उसाच्या टिपऱ्यांचे मंडल उभे करण्यात येते. त्याला वस्त्र बांधून संपूर्ण रात्र भजन, कीर्तन, नामस्मरण करत पूजा सुरू राहते. सकाळी सूर्यदर्शनाने या विधीची सांगता होते. पूजेसाठी आलेले हिंदी भाषिक दर वर्षी विधिवत पूजा करत गोदास्नानानंतर पूजेचे निर्माल्य, नैवेद्य, तसेच वस्त्रे आदी सामान आंघोळीनंतर गोदाकाठावर किंवा नदीत सोडून देत होते. यामुळे आधीच प्रदूषित असलेला गोदावरीच्या प्रदूषणात भर पडत होती. याशिवाय ठिकठिकाणी पडलेल्या कचऱ्यामुळे या संपूर्ण परिसराला काहीसे बकाल स्वरूप प्राप्त होत असे. काही वर्षांपूर्वी मनसेने उत्तर भारतीयांच्या या उत्सवाला विरोध केल्यामुळे हा उत्सव गोदाकाठावर प्रातिनिधिक स्वरूपात साजरा होई. यंदा प्रथमच गोदाकाठावर २० हजारहून अधिक उत्तर भारतीयांनी हा उत्सव उत्साहात साजरा केला. उत्सवासाठी हिंदी भाषिक राज कला सांस्कृतिक मंच, गणराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आदींच्या वतीने रामकुंड परिसरात व्यासपीठ उभारले गेले. सायंकाळ नंतर हिंदी तसेच भोजपुरी गीतांचा कार्यक्रम झाला.
उत्सवानंतर गोदाकाठाला येणारे बकाल स्वरूप लक्षात घेऊन मंचने पूजा विधी आटोपल्यानंतर स्वच्छता अभियान राबविले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्वच्छता अभियान’चा पगडा म्हणा की उत्सवाच्या पावित्र्याला धक्का लागू नये यासाठी कार्यकर्त्यांनी स्वयंस्फूर्तीने पूजेसाठी आणलेल्या साहित्यासह, निर्माल्य, नैवेद्य, काहींनी गोदामातेला अर्पण केलेली वस्त्रे यासह अन्य साहित्य एकत्रित करत मोकळ्या जागेवर आणून ठेवली. गोदावरी पात्रातील साहित्यही बाहेर काढले. कार्यकर्त्यांनी सर्व परिसर झाडून स्वच्छ करत कचरा निर्माल्य कलशात टाकून रामकुंड परिसर चकाचक केला. या ठिकाणी स्थानिकांसह राज्यभरातून येणाऱ्या भाविकांतर्फे दररोज विविध स्वरूपाचे विधी होतात. त्या वेळी अनेकदा पूजा साहित्य गोदा पात्रात सोडले जाते. हिंदी भाषिकांनी स्वच्छता मोहिमेतून सर्वासमोर नवा आदर्श निर्माण केला आहे.