हुंडा ही सामाजिक समस्या असून ती दूर करण्यासाठी सर्व सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन हुंडय़ाविरोधात सामाजिक प्रबोधन करण्याची आवश्यकता आहे. या प्रबोधनातूनच समाजातील व्यक्तींची मानसिकता बदलेल, असा विश्वास जिल्हाधिकारी ओम प्रकाश बकोरीया यांनी व्यक्त केला.
हुंडा प्रथेविरोधात जिल्ह्य़ातील सामाजिक कार्यकर्त्यांची बैठक जिल्हाधिकारी बकोरीया यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी  मार्गदर्शन करताना बकोरीया यांनी काही उपायही सूचविले. बैठकीस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण साळुंखे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एस. एस. बागूल, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजयसिंग परदेशी, सामाजिक कार्यकर्त्यां प्रतिभा शिंदे, डॉ. विजया गायकवाड आदी उपस्थित होते. वधू-वर यांसह त्यांच्या पालकांचेही प्रबोधन करावे, प्रत्येक महाविद्यालयात, मेळावा, बाजारात, अथवा सामाजिक संस्थेत जनतेशी संवाद साधावा, असेही ते म्हणाले. हुंडा संबंधित संदेश उपदेश केंद्रातून सामुदायिक विवाह सोहळे, युवती सभा, राष्ट्रीय सेवा योजना यांच्या माध्यमातून देवून या प्रथेस प्रतिबंध करण्याचे आवाहन त्यांनी केले. परदेशी यांनी बैठकीची माहिती दिली.