वाहनतळ व स्वच्छता प्रमाणपत्र नसलेल्या शहरातील ७० बीअर बार व हॉटेलला जिल्हाधिकाऱ्यांनी दंडात्मक कारवाईची नोटीस बजावली आहे. या दोन्ही गोष्टींची पूर्तता केल्याचे महापालिकेचे प्रमाणपत्र सादर करणार नाही तोवर हॉटेल परवाना नूतनीकरणाचे काम जिल्हाधिकाऱ्यांनी अडवून धरल्याने लिकर लॉबी व हॉटेल व्यावसायिकांच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे.
या जिल्ह्य़ात संपूर्ण दारूबंदी जाहीर करावी, या मागणीसाठी श्रमिक एल्गार व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज दारूमुक्ती अभियान संघटनेच्या वतीने आंदोलन पुकारण्यात आलेले आहे. यामुळे जिल्ह्य़ातील सर्व दारूविक्रेते धास्तावले असतांनाच आता जिल्हा प्रशासनाने बीअर बार, वाईन शॉप, हॉटेल व बीयर शॉपीच्या विरोधात अतिशय कडक भूमिका घेतली आहे. या शहरात जवळपास ७० बीअर बार, वाईन शॉप व हॉटेल्स आहेत. महापालिकेच्या नव्या नियमानुसार बीअर बार व हॉटेलला वाहनतळ बंधनकारक आहे, परंतु शहरातील बहुतांश बीअर बारला वाहनतळच नाही. त्यामुळे हॉटेलात येणाऱ्यांची दुचाकी व चारचाकी वाहने रस्त्यावर उभी असतात. काही मोजक्या हॉटेल्सना वाहनतळ असले तरी ते अपुरे आहेत. काही बीअर बार मालकांनी तर दुसऱ्यांच्या जागेवर स्वत:च्या बीअर बारचे वाहनतळ दाखविले आहे. एका महाभागाने तर जिल्हा परिषदेच्या मालकीची इमारतच बीयर बारची वाहनतळाची जागा म्हणून दाखविली आहे, तर काही हॉटेल्सने अंडरग्राऊंड वाहनतळ कागदावर दाखविले असले तरी प्रत्यक्षात इमारतीत तशी सुविधाच उपलब्ध नाही. ज्या हॉटेलमध्ये अंडरग्राऊंड पार्किंग आहे तेथे गाडय़ा सर्रास रस्त्यावर उभ्या असतात. त्यामुळे नियमित वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. सपना टॉकीजसमोरच्या हॉटेल व वाईन शॉपीमुळे तर मालधक्क्यांवरील ट्रक्सची वाहतूक विस्कळीत झालेली आहे. त्याचा फटका शहरातील वाहतुकीला सर्वाधिक होतो.
नगर पालिका असतांना या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करून बीअर बार व हॉटेलचा परवाना मंजूर करण्यात आला, मात्र आता जिल्हा प्रशासनाने यासंदर्भात अतिशय कठोर भूमिका घेतलेली आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्याच्या फुड परवाना नूतनीकरणाचे काम राखून ठेवले आहे. वाहनतळासोबतच शहरातील बहुतांश बीअर बार व हॉटेल्समध्ये सर्वत्र अस्वच्छता असते. हॉटेलचे किचन तर इतके अस्वच्छ असते की ओकारी व्हावी, मात्र अशाही परिस्थितीत हॉटेल सुरळीत सुरू आहेत. तसेच हॉटेलमधून निघणारे वेस्ट हॉटेलच्या अगदी समोरच्या झेंडीमध्ये उघडय़ावर फेकून देण्यात येते. त्यामुळे शहरात सर्वत्र अस्वच्छता व दरुगधीचे साम्राज्य पसरले आहे. हे वेस्ट शहरापासून लांब अंतरावर नदीच्या काठावर फेकणे बंधनकारक असतांनाही हॉटेल मालक केवळ त्रास व पैसा वाचविण्यासाठी रस्त्यावर शिळे अन्न व वेस्ट फेकून देतात. त्याचा परिणाम माणसाच्या आरोग्यावर होत आहे. या सर्व गोष्टी नियमांनी व्हाव्यात म्हणून जिल्हा प्रशासनाने शहरातील ७० बीअर बार व हॉटेलला दंडात्मक कारवाईची नोटीस बजावली आहे. जोवर महापालिकेने प्रमाणित केलेले वाहनतळ व स्वच्छता प्रमाणपत्र सादर करणार नाही तोवर हॉटेलच्या परवान्याचे नूतनीकरण रोखून धरले आहे. जिल्हाधिकारी विजय वाघमारे यांनी या सर्व हॉटेल मालकांना नोव्हेंबर महिन्यातच यासंदर्भातील नोटीस बजावली होती, मात्र आज १७ जानेवारीपर्यंत एकाही बीअर बार व हॉटेल मालकाने वाहनतळ व स्वच्छतेचा परवाना सादर केलेला नाही. बहुतांश बीअर बारला तर स्वत:ची पार्किंगच नाही, अशी माहिती महापालिकेच्या एका अभियंत्याने दिली. त्यामुळेच या सर्व हॉटेल्सच्या नूतनीकरणाचा परवाना अडवून ठेवण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी बडकेलवार यांनी लोकसत्ताशी बोलतांना दिली. या दोन्ही गोष्टींची पूर्तता करणाऱ्या हॉटेल व बार मालकांना तात्काळ परवाना देण्यात येईल, असेही ते म्हणाले.