कळमनुरी तालुक्यातील २५ गावे मोरवाडी पाणीपुरवठा योजनेचा मुद्दा अनेक दिवसांपासून गाजत आहे. आखाडा बाळापूर येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनल्याने राज्य शासनाने ही योजना हस्तांतरित करून घेण्याच्या जिल्हा परिषदेला सूचना दिल्याने जिल्हा प्रशासन उद्या सोमवारी बैठक घेणार असल्याचे सूत्रांकडून कळते.
दहा वर्षांपूर्वी जीवन प्राधिकरणच्या वतीने या योजनेचे काम करण्यात आले. काम धिम्या गतीने झाल्याने तांत्रिक चाचणीनंतर ही योजना अपूर्ण कामाच्या नावाखाली जिल्हा परिषदेने हस्तांतरित करून घेण्यास नकार दिला. या योजनेतून करण्यात आलेल्या पाणीपुरवठय़ामुळे वीजदेयकाची ७० लाखांपेक्षा अधिक रक्कम थकली. २५ गावांपैकी काही गावांना पाणी मिळत नसल्याने वीजदेयक भरण्यास ही गावे तयार नाहीत, मात्र आखाडा बाळापूरच्या १५ हजार ग्रामस्थांची तहान मोरवाडी पाणीपुरवठा योजनेच्या भरोशावरच आहे.
या योजनेचे हस्तांतरण करून घेण्यासाठी राज्य शासनाने जिल्हा परिषदेला नुकत्याच सूचना केल्याने उद्या (दि. २) रोजी जिल्हा परिषद प्रशासनाने या प्रश्नावर बैठकीचे आयोजन केले असल्याचे समजते. जिल्हय़ाच्या पालकमंत्री वर्षां गायकवाड सोमवारी हिंगोली दौऱ्यावर असल्याने मोरवाडी पाणीप्रश्नावर संजय बोंढारे यांच्या शिखर समितीचे पदाधिकारी पालकमंत्री व आमदार सातव यांची भेट घेऊन पाणीप्रश्नावर मार्ग काढण्याबाबत विनंती करणार आहेत.