किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे लेखापरीक्षण अपूर्ण असतानाच पूर्णत्वाचा दाखला दिल्याप्रकरणी कारखान्याचे लेखापरीक्षक संजय शेलार यांना साखर आयुक्तांनी निलंबनाची नोटीस बजावली आहे.
    किसन वीर कारखान्याच्या लेखापरीक्षणातील दोषांवर आमदार मकरंद पाटील व नितीन पाटील यांनी साखर आयुक्तांकडे तक्रार दिली होती. कारखान्याच्या ताळेबंद व नफातोटापत्रकांची गांभीर्याने दखल न घेता व लेखापरीक्षण पूर्ण होण्यापूर्वी वार्षकि सर्वसाधारण सभेसाठी सभासदांना दिलेल्या अहवालात ‘अ’ वर्ग दिल्याचे जाहीर केले. वार्षकि सभेपूर्वी लेखापरीक्षण पूर्ण झालेले नव्हते. शेरे व दोषारोपांसह संचालक मंडळाला अहवाल सादर केला तेव्हा वर्गवारीचा उल्लेख नव्हता असे शेलार यांनी आमदार पाटील यांना सांगितले होते. त्यानंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, साखर आयुक्त व प्रादेशिक संचालक साखर आयुक्त पुणे यांच्याकडे या प्रकरणांच्या तक्रारी केल्या होत्या. या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी सुरू झाली असून, प्रादेशिक सहसंचालक प्रदीप रावळ यांनी चौकशी करून लेखापरीक्षकांना निलंबनाची नोटीस काढली आहे. लेखापरीक्षण पूर्ण नसताना आपण असा दाखला कसा दिला याविषयी तीन दिवसांत खुलासा मागविला आहे. त्याचे उत्तर आल्यावर त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. या व्यतिरीक्त साखर आयुक्त कार्यालयात संजय शेलार यांच्या तक्रारीवर सुनावणी सुरू आहे.