येथे उद्या रविवारी होणाऱ्या विवेक निर्धार परिषदेस हिंदुत्वादी संघटनांकडून घेण्यात आलेला आक्षेप व त्यावरून पुरोगामी संघटनांनी घेतलेली आक्रमक भूमिका यामुळे ही परिषद नेमकी कशी पार पडते याकडे लक्ष वेधले आहे. परिषदेच्या निमित्ताने शहरात लावण्यात आलेल्या फलकावरील मजकुरांवरून परिषदेचे अध्यक्ष गोविंदराव पानसरे यांच्यासह १५० जणांना नोटीस बजाविली आहे. दरम्यान या परिषदेत हिंदू धर्मियांबद्दल अपशब्द वापरल्यास यापुढे परिवर्तनवाद्यांचा एकही कार्यक्रम कोल्हापुरात होऊ देणार नाही, असा इशारा शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिला. उद्या होणाऱ्या परिषदेस हिंदू संघटनांचा विरोध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.    
पुरोगामी विचार संघटनांच्यावतीने रविवारी सकाळी १० वाजता केशवराव भोसले नाटय़गृहात विवेक निर्धार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेस ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे, अॅड.गोविंदराव पानसरे मार्गदर्शन करणार आहेत. डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या विचारांचा लढा पुढे चालविण्याचा निर्धार या परिषदेमध्ये केला जाणार आहे. तथापि या परिषदेस हिंदुत्ववादी संघटनांकडून आक्षेप घेण्यात आला. त्यांच्याकडून ही परिषद रद्द करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. याची दखल घेत राजवाडा पोलिसांनी कॉ.पानसरे यांच्यासह १५० जणांना आक्षेपार्ह मजकूर लावण्याच्या कारणावरून नोटीसा बजाविल्या. यानंतर ज्येष्ठ नेते डॉ.एन.डी.पाटील, कॉ.पानसरे, माजी आमदार संपतराव पवार-पाटील, कॉ.चंद्रकांत यादव, कॉ.सतीशचंद्र कांबळे, दिलीप पवार, रघुनाथ कांबळे आदींनी पोलीस अधीक्षक जाधव यांची भेट घेतली.  पोलिसांनी बजाविलेल्या नोटीसबद्दल नाराजी व्यक्त करून एन.डी.पाटील यांनी हिंदुत्ववाद्यांनी कोल्हापुरात महायज्ञाचे आयोजन केले होते. त्याला पुरोगामी विचारांच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला होता. पण तेव्हाही आणि आताही आम्हाला का नोटीस बजाविण्यात आली, असा प्रश्न उपस्थित केला. जाधव यांनी परिषदेच्या निमित्ताने कायदा व सुव्यवस्था बिघडण्याचे काम करणाऱ्यांवर पोलीस कारवाई करतील, असे स्पष्ट केले.    
दरम्यान शनिवारी पत्रकारांशी बोलताना आमदार क्षीरसागर म्हणाले, डॉ.नरेंद्र दाभोळकर यांची हत्या ही निंदनीय घटना आहे. त्या हत्येला सनातनवाद्यांना जबाबदार धरणे अयोग्य आहे. डॉ.दाभोलकर यांच्याशी आम्ही विचारांची लढाई देत आलो आहोत. डॉ.दाभोलकर यांची हत्या सनातनवाद्यांनी केली असा आरोप करणाऱ्यांची सीआयडीमार्फत चौकशी केल्यास सत्य बाहेर पडेल. त्यांच्या हत्येचे निमित्त करून राजकारण करणाऱ्यांनी आपले उद्योग थांबवावेत असे आवाहन त्यांनी केले. यावेळी मधुकर नाझरे, चंद्रकांत बराले, रणजित आयरेकर, सुनिल जाधव, बिपीन खेडेकर, कमलाकर किलकिले, हिंदुराव शेळके, शिवानंद स्वामी, सतीश शिंदे आदी हिंदुत्ववादी उपस्थित होते.