वाहनतळाची जागा बळकावल्याबद्दल बांधकाम व्यावसायिक विनोद सगदेव यांना महापालिकेने नोटीस बजावली आहे. पूर्ती सुपर बाजारावरून महापालिकेची सायंटिफिक सोसायटीला नोटीस दिली त्याचधर्तीवर धंतोलीतील प्लॉट क्रमांक २८ वर स्थित तारा विलास अपार्टमेंटची वाहनतळाची जागा लाटलेल्या बांधकाम व्यावसायिकालाही महापालिकेने नोटीस बजावली असल्याचे ताराविलास सहनिवास असोसिएशनचे सचिव सागर कुळकर्णी यांनी सांगितले. या इमारतीचा नकाशा महापालिकेने २०००मध्ये मंजूर केला होता. त्यानंतर २००५पासून विनोद सगदेव यांनी वाहनतळाची जागा बळकावली. त्या जागेवर त्यांनी ‘सेंट्रिंग’साठी उपयोगी पडणारे बांबू साठवून ठेवले आहेत. तसेच त्यांच्या मर्जीतील एक छत्तीसगढी मजूर कुटुंब लाकडाच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्याठिकाणी ठेवले आहे. अवैधरित्या कब्जा केलेली वाहनतळाची जागा रिकामी करण्याबाबत तारा विलास सहनिवास असोसिएशनने वारंवार विनोद सगदेव यांना बजावले आहे. परंतु त्यांनी आरेरावी करून उद्दामपणे ही जागा माझीच आहे असे उत्तर दिल्याचे कुळकर्णी यांचे म्हणणे आहे. असोसिएशनला नागपूर महापालिकेकडे तक्रार करावी लागली. महापालिकेने धंतोली झोन क्रमांक चारचे सहआयुक्त व प्रभाग अधिकारी महेश मोरोणे यांनी इमारतीस भेट देऊन तक्रारीची शहानिशा केली.
सुरुवातीपासूनच विनोद सगदेव कोणत्या ना कोणत्या कारणास्तव इतर रहिवाशांना त्रास होईल या उद्देशाने उपद्व्याप करीत असतात, असा कुळकर्णी यांचा आरोप आहे. इतर रहिवाशांची संमती न घेता इमारतीवर त्यांनी वोडाफोनचे टॉवर उभारले आहे. सगदेव नियमितपणे देखभाल खर्च देत नाहीत. असोसिएशनला त्यांची सेवा खंडित करण्याचा निर्णय घ्यावा लागला, अशी माहिती सागर कुळकर्णी यांनी दिली.
      महापालिकेने सगदेव यांना बजावलेल्या नोटीसच्या प्रती कार्यवाहीसाठी धंतोली पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोककर्म विभागाचे उपअभियंता आणि उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे निबंधक यांना पाठवल्या आहेत.