27 May 2020

News Flash

प्राध्यापकांना विद्यापीठाची कारणे दाखवा नोटीस

प्राध्यापकांच्या आंदोलनाच्या सावटाखाली परीक्षा सुरू झाल्या असतानाच परीक्षविषयक कामांसाठी असहकार पुकारलेल्या प्राध्यापकांना परीक्षा नियंत्रक विलास रामटेके यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. परीक्षा मंडळाच्या बैठकीत

| March 6, 2013 03:04 am

बहिष्कार आंदोलन सुरूच
प्राध्यापकांच्या आंदोलनाच्या सावटाखाली परीक्षा सुरू झाल्या असतानाच परीक्षविषयक कामांसाठी असहकार पुकारलेल्या प्राध्यापकांना परीक्षा नियंत्रक विलास रामटेके यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. परीक्षा मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. मान्यताप्राप्त शिक्षकांना प्रात्यक्षिक अंतर्गत आणि बहिर्गत परीक्षकाच्या कामाबरोबरच लेखी परीक्षेसाठी पेपर सेटिंग, मॉडरेटर (नियामक) आणि व्हॅल्युअरचे काम करणे ही कायदेशीर जबाबदारी आहे.
मात्र प्राध्यापक त्यांची कायदेशीर जबाबदारी पार न पाडता योग्य कारण न देता त्यांनी कर्तव्य बजावण्यास नकार, परीक्षेचे काम मध्येच खंडित करणे, अर्थविषयक बाबी सादर न करणे, कर्तव्यासंबंधीचा अहवाल सादर न करणे इत्यादी कारणास्तव महाराष्ट्र विद्यापीठ कायद्याच्या ३२(५)(जी) अन्वये प्राध्यापकांना सामूहिक कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. प्राध्यापकांनी त्यांना नेमून दिलेली कामे पूर्ण न करणे आणि परीक्षा विषयक कामे करण्यास नकार देणाऱ्या प्राध्यापकांनी त्यांचे म्हणणे आठ दिवसांच्या आत विद्यापीठाला सादर करण्याची कारणे दाखवा नोटीस प्रकुलगुरू डॉ. महेशकुमार येंकी यांनी बजावली आहे.
दरम्यान या वातावरणातच विद्यार्थ्यांच्या लेखी परीक्षा सुरू झाल्या असून प्राध्यापकांच्या आंदोलनामुळे पावणे दोनशे प्रात्यक्षिक परीक्षांना यापूर्वीच फटका बसल्याच्या पाश्र्वभूमीवर लेखी परीक्षा किती सुरळीत चालतील, यावरही चिंता व्यक्त केली जात आहे. विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा पाच टप्प्यांमध्ये घेतली जाणार असून त्यात एकूण ३३ अभ्यासक्रमांच्या परीक्षा होणार आहेत. एकूण ७८० परीक्षा घेतल्या जाणार असून त्यासाठी आठ हजार पेपर सेट तयार करण्यात आले आहेत. गेल्यावर्षीच्या उन्हाळी परीक्षेत बऱ्याच विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन चुकीचे झाले होते. त्यामुळे काही विद्यार्थी न्यायालयातही गेले. काहींनी संताप व्यक्त करण्यापलीकडे काही केले नाही. न्यायालयात गेलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असून त्यातून मूल्यांकनातील त्रुटीही उघडकीस आल्या.
यावर्षी तर प्राध्यापकांनी सर्वच परीक्षा कामांवर बहिष्कार टाकल्याने आणि कायद्यानुसार ४५ दिवसांच्या आत परीक्षेचा निकाल जाहीर करणे बंधनकारक असल्याच्या पाश्र्वभूमीवर यावर्षी मूल्यांकनामध्येही गेल्यावर्षीसारखाच गोंधळ राहील, असेच चित्र दिसू लागले आहे. प्राध्यापकांना सामूहिक कारणे दाखवा नोटीस पहिल्यांदाच पाहत असून जेव्हा व्यक्तिगत नोटीस बजावली जाईल तेव्हाच आंदोलनासंबंधीचा निर्णय घेतला जाईल, अशी प्रतिक्रिया नुटाचे सचिव डॉ. अनिल ढगे यांनी दिली आहे. तूर्त प्राध्यापकांचे बहिष्कार आंदोलन सुरूच राहील, असेही ढगे यांनी सांगितले.  

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 6, 2013 3:04 am

Web Title: notice to teachers by university
टॅग Notice
Next Stories
1 नागपूरची ओळख ‘बेटर सिटी’; महापौर अनिल सोलेंचा दावा
2 बनावट नोटा बाळगल्याबद्दल ४ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा
3 एलटीटी- शालिमार या मार्गावर उन्हाळ्यासाठी विशेष गाडी
Just Now!
X