गुणवत्ता विकास कार्यक्रम व शिक्षण हक्क कायद्याची सक्त अंमलबजावणी सुरू असून, कराड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची काटेकोर तपासणी करण्यात येत आहे. गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार यांच्या नेतृत्वाखालील एक पथक व पंचायत समिती सदस्यांचा समावेश असणा-यादोन पथकांमार्फत शाळांची तपासणी सुरू आहे.
जिल्हा परिषद शाळांच्या शिक्षकांनी सकाळी साडेनऊ वाजता वर्गात हजर राहणे क्रमप्राप्त आहे. अन्यथा उशिरा येणा-याशिक्षकांवर कारवाई करण्यात येत आहे. लेटकमरची तक्रार गंभीर मानली जाणार असून, अशा शिक्षकांची विदाऊट पे, वेतनवाढ रोखणे या कारवाईबरोबर खातेनिहाय चौकाशीचे प्रस्ताव वरिष्ठांना पाठविण्यात येणार आहेत.
गुणवत्ता विकास कार्यक्रमांतर्गत शाळांची तपासणी सुरू असताना, गत पंधरवडय़ात ६० शिक्षकांना नोटिसा जारी करण्यात आल्या आहेत. कामात कुचराई, शाळेत उशिरा येणे, तसेच विद्यार्थ्यांचे अप्रगत वाढते प्रमाण, आदी कारणास्तव ६० शिक्षक, कराड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाच्या कचाटय़ात सापडले आहेत. या कारवाईचे सर्वसामान्यांसह पालकवर्गातून स्वागत होत आहे. मात्र, ही कारवाई केवळ फार्स न ठरता विद्यार्थ्यांच्या हिताची आणि समाजाच्या उद्धाराची ठरावी अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे.
डॉ. पवार यांच्या पथकाने केलेल्या तपासणीत शाळेत उशिरा येणा-याअर्थात लेटकमर २० शिक्षकांना, तर कामात कुचराई अर्थात भोंगळ कारभाराचा दाखला ठरणा-या ४० शिक्षकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तर या शिक्षकांकडून खुलासा मागविण्यात आला आहे. काही शिक्षकांचे खुलासे प्राप्त झाले आहेत. शाळा तपासणी ही मोहीम सुरू च राहणार असल्याचा इशारा डॉ. पवार यांनी दिला आहे.