आद्य भारतीय गणितज्ज्ञ भास्कराचार्य यांच्या नवव्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्त ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना गणित विषयाबद्दल वाटणारी भीती दूर व्हावी, या हेतूने सप्टेंबर महिन्यात राज्यभरातून गणित यात्रा काढण्यात येणार आहेत. केंद्र शासनाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या सहकार्याने आयोजित या गणित जागरण मोहिमेत गणित विषयाचे तीन हजार शिक्षक सहभागी होत असून त्यांच्या माध्यमातून २२ जिल्ह्य़ांतील किमान दोन लाख विद्यार्थ्यांना रूक्ष गणिताची रंजक पद्धतीने ओळख करून दिली जाणार आहे. ठाण्यातील जिज्ञासा संस्थतर्फे राबविल्या जाणाऱ्या या उपक्रमात राज्यभरातील २२ संस्था सहभागी होत आहेत.  ९ ते १८ सप्टेंबर दरम्यान मुंबईहून निघणारी मुख्य यात्रा ठाणे-नाशिक-धुळे-नंदुरबार-जळगांव- औरंगाबाद-जालना-बुलढाणा-अकोला-अमरावती-वर्धा-नागपूर या जिल्ह्य़ातील ग्रामीण भागात फिरणार आहे. या मुख्य यात्रेला पूरक गडचिरोली-भंडारा-गोंदिया या भागातून आणि सोलापूर-उस्मानाबाद-नांदेड-लातूर, बीड-परभणी-हिंगोली या जिल्ह्य़ांमधून दोन पूरक यात्रा निघतील.
मराठवाडा मुक्तीदिनी १७ सप्टेंबर रोजी या तिन्ही यात्रा औरंगाबाद येथे एकत्र येणार आहेत. त्यानंतर १८ सप्टेंबर रोजी चाळीसगावजवळील भास्कराचार्याच्या पाटण या जन्मगावी गणित यात्रेचा समारोप होणार आहे.  ग्रामीण भागातील मुलांमध्ये गणित या विषयाबाबत वाटणारी भीती अथवा न्यूनगंड घालविणे हा या यात्रेचा प्रमुख उद्देश आहे. त्यासाठी या काळात ठिकठिकाणी कार्यशाळा, शिबिरे, मार्गदर्शन वर्ग तसेच व्याख्याने आयोजित केली जाणार आहेत.  
या जागर मोहिमेत गणितातील रंजकता आणि आनंद विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी विशेष पुस्तके, सीडीज् आदी दृक्श्राव्य साहित्य प्रकाशित केले जाणार आहे. तसेच यात्रेच्या मुक्कामाच्या ठिकाणी गणित कुट प्रश्न, प्रश्नमंजूषा, शिक्षक तसेच विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र अभ्यासवर्ग घेतले जाणार आहेत.  या गणित जागरण मोहिमेत राज्यभरातील गणित तसेच विज्ञानप्रेमी मंडळींनी सहभागी व्हावे, असे आवाहन ‘जिज्ञासा’चे सुरेंद्र दिघे यांनी केले आहे.