मराठी साहित्यातील गाजलेल्या ‘बिढार’ या भालचंद्र नेमाडे यांच्या साहित्यकृतीचा अनुवाद डॉ. संतोष भूमकर यांनी केला. या अनुवादासह ‘मराठी पोएट्री १९७५ ते २०००’ या दोन्ही पुस्तकांचे प्रकाशन साहित्य अकादमीकडून करण्यात आले. या बरोबरच नेमाडे यांच्या झूल, हूल, जरिला या कादंबऱ्यांच्या अनुवादाची जबाबदारीही डॉ. भूमकर यांच्यावर अकादमीने सोपविली आहे.
‘मराठी पोएट्री १९७५ ते २०००’ या पुस्तकात नामदेव ढसाळ ते कविता महाजन अशा ३५ कवींच्या प्रत्येकी ५ कवितांचा अनुवाद करण्यात आला आहे. या बरोबरच प्रसिद्ध कादंबरीकार भालचंद्र नेमाडे यांच्या ‘बिढार’ कादंबरीचेही ‘ऑन द मुव्ह’ नावाने पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. डॉ. भूमकर यांनी या पूर्वी शरणकुमार लिंबाळे यांच्या ‘अक्करमाशी’ आत्मकथनाचा इंग्रजीत अनुवाद केला. त्यानंतर ग्रेट ब्रिटनमध्ये त्यावर चित्रपट निर्माण केला जात आहे. डॉ. भूमकर यांनी हरिभाऊ आपटे यांच्या ‘पण लक्षात कोण घेतो’ कादंबरीचाही अनुवाद केला आहे. इंग्रजी अनुवादाच्या क्षेत्रात डॉ. भूमकर यांचे नाव साहित्यवर्तुळात महत्त्वाचे मानले जाते.