महावितरणकडून मुळा-प्रवरा वीज संस्थेच्या कार्यक्षेत्रातील ग्राहकांना नवीन वर्षांत नवी भेट मिळाली असून सर्व गावठाण हद्दीत घरगुती वीज ग्राहकांना २४ तास विजपुरवठा केला जाणार आहे. या कामावर आतापर्यंत २० कोटी रुपये खर्च झाले असून उर्वरित  ६४ कोटींच्या कामास मंजुरी मिळाली आहे.
मुळा-प्रवरा वीज संस्थेचा वीज वितरण परवाना फेब्रुवारीमध्ये संपला. संस्थेच्या कार्यक्षेत्रातील श्रीरामपूर, राहुरी, राहाता, संगमनेर व नेवाशाच्या काही गावांतील वीज वितरण महावितरणकडे आले. महावितरणने गावठाण स्वतंत्र करुन २४ तास वीजपुरवठा करण्यासाठी निविदा काढल्या. हे काम औरंगाबाद येथील महाअ‍ॅक्टीव्ह या कंपनीस देण्यात आले. कंपनीने २० कोटी रुपये खर्च करून काही काम केले. पण वीज नियामक आयोगाकडे मुळा-प्रवरेने अपील केले. त्यामुळे महावितरणने सर्व विकासकामे बंद केली. तसेच तांत्रिक कारणामुळे कंपनीने हे काम थांबविले. माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या अध्यक्षतेखाली वीज ग्राहक संघटनेने वीज नियामक आयोगाकडे अपील करून महावितरणने थांबविलेली कामे पुन्हा त्वरित सुरू करावी अशी मागणी केली होती. आयोगाने महावितरणला त्वरित कामे सुरू करण्याचा आदेश दिला होता.
महावितरणने गावठाण फिडर स्वतंत्र करण्याकरता पुन्हा निविदा मागविल्या. सांगली येथील भारत इलेक्ट्रीकल्स यांची ६४ कोटींची निविदा मंजूर करण्यात आली. कंपणीला कार्यारंभ आदेश देण्यात आला असून नवीन वर्षांच्या पहिल्या आठवडय़ात कामास सुरूवात होणार आहे.
येत्या वर्षभरात संस्थेच्या कार्यक्षेत्रातील सर्व गावांतील घरगुती, व्यापारी व औद्योगिक ग्राहकांना २४ तास वीजपुरवठा केला जाणार आहे. त्याकरिता वीज वाहिनीचे स्वतंत्र जाळे टाकू न स्वतंत्र रोहित्र बसविले जाणार आहे. जादा विजेचा भार असलेल्या रोहित्राच्या जागी नवीन रोहीत्र बसविले जाईल. तसेच वीज उपकेद्रांत नवीन यंत्रे बसवून क्षमता वाढविली जाईल. सुमारे १०० हून अधिक गावांतील ७० हजारांहून अधिक ग्राहकांना याचा लाभ होईल. महावितरणचे कार्यकारी अभियंता संतोष सांगळे यांनी त्याला दुजोरा दिला.  शेती ग्राहकासाठी वीज पुरवठा पुरेशा दाबाने व्हावा म्हणून नवीन प्रणाली सुरू करण्यात येणार आहे. नवीन वीजजोड देण्यासही प्रारंभ करण्यात आला आहे. गावठाण स्वतंत्र केल्याने आता ज्या रोहित्रावर जादा दाब आहे तो कमी होईल. पुरेशा दाबाने शेतीला वीजपुरवठा होऊ शकेल, असा विश्वास सांगळे यांनी व्यक्त केला.