रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) अध्यक्ष रामदास आठवले यांचा मुलगा जीत आठवले ‘वारस-एक इच्छा’ या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत शिरकाव करत आहे. या चित्रपटात तो नायकाच्या लहानपणीची भूमिका साकारत असून त्याची भूमिका बऱ्यापैकी मोठी आणि महत्त्वाची असल्याचे चित्रपटाचे दिग्दर्शक के. विलास यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
राजकारण्यांची मुले चित्रपटात येणे ही गोष्ट आता नवीन राहिलेली नाही. आधी अभिनेते आणि नंतर नेते बनलेल्या खा. सुनील दत्त यांचा मुलगा संजय दत्त, विलासराव देशमुख यांचा मुलगा रितेश देशमुख अशी काही उदाहरणे देता येतील. मात्र रामदास आठवले यांच्या मुलाने येथेही बाजी मारली आहे. संजय दत्त किंवा रितेश देशमुख हे थेट नायकाच्या भूमिकेत चित्रपटात दिसले. मात्र रामदास आठवले यांच्या मुलाने लहान वयातच चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. एखाद्या विवाहित महिलेला मूल होत नसल्यास सासू-सासरे आणि नवऱ्याकडून तिचा होणारा छळ, त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या अशा सामाजिक आणि कौटुंबिक विषयावर हा चित्रपट आधारित आहे. या चित्रपटात जीत आठवलेच्या मोठेपणीच्या भूमिकेत डॉ. अमोल कोल्हे असतील. त्याशिवाय अद्याप इतर कलाकारांची नावे जाहीर झालेली नाहीत. चित्रपटाची निर्मिती विश्वनाथ सपकाळे करत असून हा चित्रपट मे २०१३ मध्ये प्रदर्शित होईल.