शहरात फ्लेक्सचे फलक लावण्यास राहाता नगरपालिकेने बंदी घातली आहे. तशा आशयाचा ठराव सोमवारी झालेल्या पालिकेच्या सर्वसाधरण सभेत बहुमताने मंजूर केला असल्याची माहिती नगराध्यक्ष कैलास सदाफळ यांनी दिली.
शहरात जागोजागी लागणाऱ्या फ्लेक्स फलकांबाबत उशिरा का होईना, पालिकेने पावले उचलल्याने शहरातील नागरिकांनी नगराध्यक्ष कैलास सदाफळ व त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले. फ्लेक्सच्या फलकांमुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत होता. त्याकडे पाहण्याच्या नादात कित्येक अपघात झाले. महत्त्वाच्या ठिकाणची जागा फ्लेक्समुळे व्यापली जात असल्याने शहराचे सौंदर्य बिघडत चालले होते. या सर्व दुष्परिणांची दखल घेऊन पालिकेने हा निर्णय घेतला असून, दि. १ नोव्हेंबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होणार आहे.
यापुढे फ्लेक्स फलकाला परवानगी मिळणार तर नाहीच, मात्र विनापरवाना ते लावल्यास संबंधितांवर तात्काळ कारवाई केली जाईल. यामुळे नागरिकांनी विविध संघटना, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, सेवाभावी संस्थांनी अगर सामाजिक संघटनांनी यांची नोंद घ्यावी. येथून पुढे कुठलेही फ्लेक्स बोर्ड लावू नयेत. शहर विद्रूप होणार नाही याची काळजी घ्यावी व नगरपालिकेला सहकार्य करावे असे आवाहन नगराध्यक्ष कैलास सदाफळ यांनी केले आहे.