सर्वसामान्यपणे कुठल्याही रेल्वे स्थानकावर कचरा आणि घाण हे दृश्य नेहमीचेच झाले आहे. परंतु आता घाण करणाऱ्यांना सावध राहावे लागणार आहे. कारण असा कुणी आढळून आल्यास त्याला ५०० रुपयांपर्यंत दंड करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
रेल्वे स्थानकावर स्वच्छता आणि आरोग्य कायम राखण्याच्या विपरित कारवाया करणाऱ्यांना आळा घालण्यासाठी रेल्वेचे नियम आहेतच. मात्र या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींना दंड करण्याची तरतूद असलेल्या नियमांसह एक अधिसूचना रेल्वे मंत्रालयाने अलीकडेच काढली आहे. त्यानुसार, रेल्वे स्थानक परिसरात कचरा फेकण्यासाठी किंवा ठेवण्यासाठी ठरवून दिलेल्या जागेव्यतिरिक्त इतर कोणत्याही जागेवर कचरा फेकता किंवा साठवून ठेवता येणार नाही.
स्वयंपाक तयार करणे, स्नान करणे, थुंकणे, मल-मूत्र विसर्जन, पशुपक्ष्यांना खाणे खाऊ घालणे, वाहनांची दुरुस्ती करणे किंवा ती धुणे, भांडी किंवा कपडे धुणे या कामांसाठी तयार केलेल्या विशिष्ट सुविधांव्यतिरिक्त इतर कोणत्याही जागेवर ही कामे करण्यास मनाई करण्यात आली आहे.
रेल्वे ही आपलीच संपत्ती समजून रेल्वेगाडय़ांवर पत्रके चिकटवण्याचे काम अनेकजण करत असतात. मात्र यापुढे कायदेशीर अधिकार देण्यात आलेला नसताना रेल्वेचे कंपार्टमेंट, कॅरेज किंवा रेल्वे स्थानक परिसरात कुठेही पोस्टर चिकटवणे, काही लिहिणे किंवा चित्र काढणे यांनाही प्रतिबंध करण्यात आला
आहे.
कचरा साठवण्यासाठी किंवा त्याची विल्हेवाट लावण्यासाठी कचरापेटी अथवा कंटेनर ठेवणे फेरीवाले आणि विक्रेते यांना बंधनकारक करण्यात आले आहे. वरील नियमांचे पालन न करणाऱ्यांना किंवा त्यांचे उल्लंघन करणाऱ्या ५०० रुपयांपर्यंत दंड केला जाऊ शकतो. स्टेशन मास्तर किंवा स्थानक व्यवस्थापक, तिकीट संग्राहक किंवा रेल्वे प्रशासनाने यासाठी प्राधिकृत केलेला अधिकारी यांना असा दंड आकारण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.