पास संपल्याचे सकाळी कामावर जाताना लक्षात यावे आणि तिकीट खिडकीवरील लांबचलांब रांग नजरेला पडावी. एटीव्हीएम मशीनसमोर उभ्या असलेल्यांची मशीनवरील ठोकाठोक पाहिली की पूर्णपणे हताश भावना मनाचा ताबा घेते. या प्रसंगांतून गेला असाल, तर आता मध्य रेल्वेने तुमची सुटका करण्याचा मार्ग शोधून काढण्याच्या दृष्टीने जोरदार प्रयत्न चालवले आहेत. येत्या काळात आपल्या हातातल्या मोबाइलवरून उपनगरीय रेल्वे तिकिटे आणि पास काढता येणार आहेत. यासाठी मध्य रेल्वेने दिल्लीतील क्रिस नावाच्या एका कंपनीला संशोधन आणि विकासाचे अधिकार दिले असून ही कंपनी या संशोधनाच्या अंतिम टप्प्यात आहे.
या नव्या तंत्रज्ञानाच्या आधारे प्रवाशांना चालता-चालता, घरबसल्या किंवा अगदी कुठेही आपल्या प्रवासाचे तिकीट काढता येणार आहे. सध्या लांब पल्ल्याच्या गाडय़ांसाठी मोबाइलवरून तिकीट हा पर्याय उपलब्ध आहे. पण उपनगरीय गाडय़ांसाठी अजूनही प्रवाशांना रांगा लावाव्या लागत आहेत. जेटीबीएस आणि एटीव्हीएम हे पर्याय देऊनही रांगांचे प्रमाण कमी होत नाही. त्यामुळे प्रवाशांना किमान वेळेत तिकिटे मिळू शकतील, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी अतुल राणे यांनी सांगितले. हे तंत्रज्ञान अद्यापही संपूर्ण तयार नसून विविध समस्यांचा विचार केला जात असल्याचेही ते म्हणाले.
मोबाईल तिकिटांचे
पैसे कसे भरणार?
*मोबाइलवरून तिकीट मिळवण्यासाठी अनेक समस्यांपैकी एक समस्या म्हणजे प्रवाशांकडून पैसे कसे घ्यायचे? यासाठी विविध पर्यायांची चाचपणी सुरू आहे. लांब पल्ल्याच्या गाडय़ांसाठी डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरले जाते. मात्र उपनगरीय प्रवास करणाऱ्या प्रत्येकाकडेच असे कार्ड असणे अपेक्षित नाही. त्यामुळे मोबाइल सेवा देणाऱ्या एअरटेल, व्होडाफोन आदी कंपन्यांचा पर्यायही विचारात घेतला जात आहे.
*एखाद्या प्रवाशाने प्रवास करण्याआधीच तिकीट काढले आहे अथवा नाही, हे कसे तपासायचे, याबाबतही संशोधन सुरू आहे. विनातिकीट प्रवास करणारे प्रवासी प्रवासादरम्यान तिकीट निरीक्षक दिसल्यावर लगेच मोबाइलद्वारे तेवढय़ापुरतेच तिकीट काढण्याची शक्यता आहे. हे टाळण्यासाठी काय करता येईल, याची चाचपणी होत आहे.
*हे तिकीट तपासण्यासाठी कोणती प्रणाली वापरायची, मासिक पास कसा जतन करायचा, याबाबतही ‘क्रिस’ कंपनीशी चर्चा चालू आहे.