शहरातील सीएनजीची वाढती मागणी व पुरवठय़ात होत असलेला तुटवडा लक्षात घेऊन कात्रज आणि गुलटेकडी येथे सीएनजी पंपांसाठी जागा देण्याचा ठराव महापालिकेच्या मुख्य सभेत सोमवारी एकमताने मंजूर करण्यात आला.
शहरात सीएनजीची मागणी वाढत असली, तरी सीएनजी पंपांची संख्या मात्र अपुरी असल्यामुळे प्रामुख्याने रिक्षाचालकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे शहरात सीएनजी पंपांची संख्या वाढवावी अशी मागणी सातत्याने होत होती. या मागणीचा विचार करून महापालिकेने सीएनजी पंपांना जागा द्यावी, असा प्रस्ताव पुढे आला होता. या प्रस्तावानुसार महापालिकेच्या दोन जागा सीएनजी पंपांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्य सभेत सभागृहनेता सुभाष जगताप, विरोधी पक्षनेता वसंत मोरे, काँग्रेसचे गटनेता अरविंद शिंदे यांची या विषयावर भाषणे झाली.
शहरात सीएनजी पंपांच्या जागा वाढवणे आवश्यक असून त्यांना आपण कुठे कुठे जागा उपलब्ध करून देऊ शकतो, त्याची यादी महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड या कंपनीला पाठवा तसेच त्यांना शहरात कुठे कुठे जागा मिळणे अपेक्षित आहे त्याचीही यादी मागवा. जेणेकरून शहरात जास्तीतजास्त ठिकाणी सीएनजी पंप सुरू होतील, अशी सूचना सुभाष जगताप यांनी या वेळी केली. सीएनजी उपलब्ध होत नसल्यामुळे रिक्षा चालकांना कितीतरी तास रांगतेच थांबावे लागत आहे. त्यांनी व्यवसाय कधी करायचा असा प्रश्न या वेळी मोरे यांनी उपस्थित केला.
सदस्यांच्या सूचनांप्रमाणे शहरातील कोणत्या जागा सीएनजी पंपांसाठी देणे शक्य आहे, त्याची यादी करून ती पाठवली जाईल, असे निवेदन या वेळी उपायुक्त आर. टी. शिंदे यांनी केले.
कात्रज सर्वेक्षण क्रमांक १३० ते १३३ येथे महापालिकेचा कचरा रॅम्प आहे. तेथील साडेसात हजार चौरसफूट इतकी जागा सीएनजी पंपासाठी दिली जाणार आहे. तसेच गुलटेकडी सर्वेक्षण क्रमांक ४२७ येथे महापालिकेची जागा असून तेथील पाच हजार चौरसमीटर इतकी जागा सीएनजी पंपासाठी दिली जाणार आहे. या दोन्ही जागा ३० वर्षांच्या कराराने भाडेतत्त्वावर दिल्या जाणार आहेत.