मुंबईत बॉलिवूड असले तरी त्याबाबतच्या अभ्यासक्रमाची-प्रशिक्षणाची सोय विद्यापीठ पातळीवर नव्हती. दिवसेंदिवस चित्रपट, दूरचित्रवाणी आदी मनोरंजन उद्योगाचा विस्तार होत असल्याने आता मुंबई विद्यापीठाने त्याची दखल घेत २०१३-१४ या आगामी शैक्षणिक वर्षांपासून चित्रपट, टीव्ही आणि माध्यमांचे औपचारिक शिक्षण देणाऱ्या अभ्यासक्रमांची सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई विद्यापीठाच्या विद्वत सभेची बैठक सोमवारी झाली. त्यात आगामी शैक्षणिक वर्षांसाठी तब्बल ११ नवीन अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. तर बी. कॉमच्या दुसऱ्या वर्षांसाठी तीन नवीन विषय समाविष्ट करण्यात आले आहेत. त्यात किरकोळ व्यवस्थापन (रिटेल मॅनेजमेंट), विमा आणि उद्योजकता विकास या विषयांचा समावेश आहे.
नवीन अभ्यासक्रमांमध्ये चित्रपट व टीव्हीविषय पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणाबरोबरच ग्रामीण विकास, भक्ती साहित्य अशा वेगळय़ा विषयांवरील प्रामुख्याने व्यवसायाभिमुख शिक्षण-प्रशिक्षणाचा समावेश आहे. पदवी, पदविका  आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रम अशा स्वरूपात ते शिकवले                       जातील.