16 December 2017

News Flash

गॅस सिलिंडरही ठेवा आता बंदोबस्तात!

अगदी काल-परवापर्यंत सोने-चांदी, रोख रकमेवर डोळा ठेवून घरफोडय़ा करणाऱ्या चोरटय़ांनी आता आपला मोर्चा घरगुती

नीलेश पानमंद | Updated: December 4, 2012 12:15 PM

अगदी काल-परवापर्यंत सोने-चांदी, रोख रकमेवर डोळा ठेवून घरफोडय़ा करणाऱ्या चोरटय़ांनी आता आपला मोर्चा घरगुती तसेच व्यावसायिक गॅस सिलिंडरकडे वळविला आहे. महागडय़ा सिलेंडरमुळे सर्वसामान्य ‘गॅस’वर आले असून काळ्या बाजारात व्यावसायिक गॅस सिलेंडरला भलतेच महत्त्व प्राप्त झाले आहे. नेमके हेच हेरून चोरटे आता घरातील किमती ऐवज लांबविताना गॅस सिलिंडरही पळवू लागले आहेत. चोरीच्या या नव्या ‘ट्रेंड’मुळे पोलीसही अचंबित झाले आहेत.
गेल्या काही वर्षांपासून मुंबई, ठाणे, नवी मुंबई तसेच शहरी भागांमध्ये महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरीचे प्रकार वाढीस लागले आहेत. या शहरांमध्ये घरफोडीच्या घटनाही आता नित्याच्या बनल्या आहेत. नवी मुंबई पोलिसांनी मध्यंतरी सोनसाखळी चोरीच्या घटना कमी व्हाव्यात यासाठी ‘उजवीकडून चला’, असा नवा ‘सुरक्षा मंत्र’ दिला होता. चोर-पोलिसांमधले हे रणनीती युद्ध नेहमीच सुरू असते. मात्र, चोरटय़ांनी सध्या घरफोडी करताना गॅस सिलिंडरही पळवून नेण्याचे प्रकार सुरू केल्याने पोलिसांपुढे नवा पेच उभा राहिला आहे.  
मुंब्रा येथील ठाकुरपाडा भागात रहिस मेहबूब कुरेशी राहतात. चार दिवसांपूर्वी त्यांचा लहान भाऊ घराचा दरवाजा उघडा ठेवून दुकानात दूध आणण्यासाठी गेला. या संधीचा फायदा घेत चोरटय़ांनी घरातून ८० हजारांची रोकड तसेच सोन्याचे दागिने, असा एक लाख ८० हजारांचा ऐवज चोरून नेला. याशिवाय ७०० रुपये किंमतीचा गॅस सिलिंडरही ते घेऊन गेले.
केंद्र शासनाच्या धोरणामुळे गॅस सिलिंडर भलताच महाग झाला असून काळ्या बाजारात त्याचे दर भलतेच वाढले आहेत. हीच बाब लक्षात घेऊन चोरटय़ांनी आता घरातून गॅस सिलिंडरही चोरून नेण्यास सुरुवात केली आहे. डहाणूनजीक चारोटी नाका तसेच भिवंडी महामार्गावरही काही ढाब्यांमध्ये अशी चोरटी गॅस सिलिंडरची विक्री होत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

First Published on December 4, 2012 12:15 pm

Web Title: now cylinders are remain in tight security
टॅग Cylinders,Prise Hike