20 November 2017

News Flash

आता पोलिसांच्या रडारवर तृतीयपंथीय आणि भिकारी

वाढते गुन्हे रोखणे, त्यांचा तपास करणे तसेच बंदोबस्त ठेवून कायदा सुव्यवस्था राखणे ही ‘पोलिसिंग’ची

सुहास बिऱ्हाडे, मुंबई | Updated: January 25, 2013 12:10 PM

वाढते गुन्हे रोखणे, त्यांचा तपास करणे तसेच बंदोबस्त ठेवून कायदा सुव्यवस्था राखणे ही ‘पोलिसिंग’ची कामे करण्यासाठीच पुरेसे पोलीस उपलब्ध नसताना पोलिसांवर आता आणखी एक जबाबदारी येऊन पडली आहे. शहरातील भिकारी आणि तृतीयपंथीयांवर कारवाई करण्याचे काम यापुढे त्यांना करावे लागणार आहे. हे काम पोलिसांचेच असले तरी अंमलबजावणी उपायुक्तांनी एक पत्रक काढून मुंबई पोलिसांनी अधिक व्यापक प्रमाणात या भिकारी आणि तृतीयपंथीयांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
मुंबई धार्मिक स्थाने, रेल्वे स्थानके, बस स्टँड आदी ठिकाणी भिकारी हमखास त्रास देत असतात. भीक मागत आसपास घुटमळणाऱ्या लहान मुलांचा त्रास अधिकच जाणवतो. सगळ्यात कहर तर तृतीयपंथीयांचा असतो. सिग्नलला गाडी थांबली की तृतीयपंथी आणि भिकारी हटकून समोर उभे राहतात. त्यांच्याविरुद्धच आता पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. अंमलबजावणी पोलीस उपायुक्त (अंमलबजावणी) बी. जी. शेखर यांनी नुकतेच मुंबईच्या सर्व पोलीस ठाण्यांना पत्रक काढून तृतीयपंथीय, भिकारी आणि भीक मागणाऱ्या लहान मुलांवर कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत.
मुंबईतून भिकाऱ्यांचे उच्चाटन व्हावे, त्यांना भीक मागण्यापासून परावृत्त करावे या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात येणार आहे. मुंबई सेंट्रल, नागपाडा, एस ब्रीज, भायखळा आदी परिसरात सर्वाधिक भिकारी असून त्यांच्यावर कारवाई करण्याचे ठळकपणे नमूद करण्यात आले आहे. धार्मिक स्थळी भाविकांना त्रास होऊ नये म्हणून तेथील भिकाऱ्यांवर कारवाई करण्यावर विशेष जोर देण्यात आला आहे. सर्वाधिक भिकारी हे रेल्वे स्थानक आणि एसटी स्टँड परिसरात आश्रयाला आणि झोपायला असतात.  परंतु या ठिकाणी झोपलेल्या या भिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येऊ नये अशा सूचना या पत्रकात करण्यात आल्या आहेत. बाल-भिकाऱ्यांवर कारवाई करून त्यांची सुधारगृहात रवानगी करावी आणि त्यांचे पुनर्वसन करावे, अशीही सूचना या पत्रकात करण्यात आली आहे.खरेतर भिकारी आणि तृतीयपंथीयांवर कारवाई करणे हे पोलिसांचे काम आहे. परंतु पोलीस पुरेशा गांभीर्याने कारवाई करत नसल्याचे दिसून आले आहे. परंतु सध्या आहे तोच व्याप सांभाळत हे काम करणे कठीण असल्याचे अनेक अधिकारी खासगीत सांगत आहेत. अंमलबजावणी विभागाने हे पत्रक काढले खरे पण पोलिसांचा प्रतिसाद बघता ही मोहीम कितपत यशस्वी होईल, याबाबत खुद्द काही पोलीस अधिकाऱ्यांनीच शंका उपस्थित केली आहे.

पोलिसांना करावी लागणारी अतिरिक्त कामे
*  वृद्ध आणि ज्येष्ठ नागरिकांच्या घरी दर आठवडय़ाला भेटी देऊन त्यांच्या नोंदी ठेवणे
*  लहान मुलांच्या अपहरणाच्या घटना टाळण्यासाठी रस्त्यावर झोपणाऱ्या मुलांचे सर्वेक्षण करणे
*  गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेरोजगार तरुणांवर नजर ठेवणे
पत्रकामागची कहाणी
लोकलेखा समितीची एक बैठक नुकतीच विधान भवनात घेण्यात आली होती. आमदार गिरीश बापट यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीत पोलीस भिकारी आणि तृतीयपंथीयांवर कारवाई करण्यात अपयशी ठरल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती. २०११ च्या तुलनेत २०१२ या वर्षांची आकडेवारी सादर करून भिकाऱ्यांचा उपद्रव रोखण्यास पोलीस अपयशी ठरल्याचे सांगण्यात आले होते. विशेष म्हणजे दैनंदिन कारवाईचा अहवाल सहाय्यक पोलीस आयुक्तांकडे सादर करावयाचा आहे.

First Published on January 25, 2013 12:10 pm

Web Title: now eunuch and begers are on the police radar
टॅग Eunuch,Gegers,Police