कॅम्पस प्लेसमेंटबरोबरच आपल्यासाठी योग्य आणि साजेसा असा उमेदवार निवडण्यासाठी अनेक मोठय़ा खासगी कंपन्या आता स्पर्धाचे माध्यम वापरू लागल्या आहेत. एमबीए किंवा तत्सम व्यवस्थापन पदवीधरांच्या निवडीसाठी तर ‘टॅलेण्ट हंट’चा हा ट्रेंड चांगलाच रुजला आहे. त्यामुळे, जेबीआयएसएस, सिडनहॅम, वेलिंगकर्स, सोमैय्या या मुंबईतील लहानमोठय़ा बी-स्कूलमधील विद्यार्थी सध्या या स्पर्धाच्या शोधात किंवा तयारीत असलेले पाहायला मिळतील.
तरूण विद्यार्थ्यांच्या डोक्यात शिजणाऱ्या एकापेक्षा एक भन्नाट आणि नव्या कल्पना या स्पर्धाच्या माध्यमातून खासगी कंपन्यांना मिळतात. त्याचा त्यांना आपले उत्पादन खपविण्यासाठी उपयोग होतोच; शिवाय ज्या ज्या महाविद्यालयांमध्ये या स्पर्धा पोहोचतात त्या ठिकाणी कंपनीचे मोठय़ा प्रमाणावर ब्रँडिंगही होते. पदवी हातात येण्याआधीच एका मोठय़ा कंपनीत अधिकारी पदावरील नोकरी पक्की होणे, हे विद्यार्थ्यांच्याही पथ्यावर पडू लागले आहे. त्यामुळे, कोणत्या कंपन्या आपल्या स्पर्धा कधी भरवितात हे शोधण्यात एमबीएचे विद्यार्थी गुंतलेले असतात.
देशभरात दरवर्षी सुमारे तीन लाख ८५ हजार विद्यार्थी व्यवस्थापन अभ्यासक्रमाची पदवी किंवा तत्सम पदविका मिळवित असतात. ‘कॅम्पस प्लेसमेंट’ केवळ काही बी-स्कूलपुरत्याच मर्यादित असतात. लहान कंपन्यांमध्ये लपलेले व्यवस्थापनाचे ‘टॅलेण्ट’ही पुढे येण्यासाठी स्पर्धाचा उपयोग होतो. कारण, या स्पर्धा सगळ्यांसाठी खुल्या असतात.
सध्या टॅलेण्ड हंटच्या स्पर्धा भरविण्यात एअरटेल, ह्य़ुंदाई, पेप्सिको, महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र, गुगल अशा अनेक मोठमोठय़ा कंपन्या आघाडीवर आहेत. दिल्ली, कोझीकोड, लखनऊ, मद्रास अशा भारताच्या कोणत्याही भागात या स्पर्धा होत असल्याने विद्यार्थ्यांनाही त्या निमित्ताने मुंबईबाहेर पडून फिरण्याची संधी मिळते. या स्पर्धाचे स्वरूप राष्ट्रीय असल्याने भारतभरातील अनेक लहानमोठय़ा व्यवस्थापन संस्थांमधील विद्यार्थी, कंपन्यांचे उच्चपदस्थ, व्यावसायिक यांना भेटण्याची, संवाद साधण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळते. त्यामुळे, म्हणावे तसे यश मिळाले नाही तरी विद्यार्थ्यांचे परीघ विस्तारण्याचे काम या स्पर्धा निश्चितपणे करतात, असे ‘जमनालाल बजाज इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज’चे (जेबीआयएमएस) प्रा. बाळकृष्ण परब यांनी सांगितले.
काही स्पर्धाची माहिती
वॉर रूम
‘महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र’तर्फे २००९पासून ही स्पर्धा आयोजित केली जाते. यात कंपनीला प्रत्यक्षात येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी उपाय सुचविण्याचे आव्हान विद्यार्थ्यांना असते. मार्केटिंग, फायनान्स अशा व्यवस्थापनाच्या विविध विषयांशी संबंधित आव्हाने विद्यार्थ्यांसमोर ठेवली जातात.
आय-क्रिएट
‘भारती एअरटेल’मार्फत आयोजिल्या जाणाऱ्या या स्पर्धेत देशभरातील १५ बी-स्कूलमधून विद्यार्थ्यांच्या ३००हून अधिक टीम सहभागी होतात. कंपनीने ही स्पर्धा २००९साली सुरू केली. पण, गेल्या वर्षीपासून या स्पर्धेत यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांना कंपनी आपल्याकडे नोकरी देऊ करते आहे. या टीम्सना कंपनीसमोरील आव्हानांवर मात करण्याची जबाबदारी सोपविली जाते. स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या एका विद्यार्थ्यांने एअरटेलच्या ‘ग्रीन-सीम’चे मार्केटिंग कसे करायचे यावर उपाय सुचविला होता. या सीमच्या माध्यमातून खते, शेती, उत्पादन कसे वाढवायचे या बद्दलच्या ‘टीप्स’ देऊन ही सेवा शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय करता येईल, याची योजना गुडगावमधील एका विद्यार्थ्यांने आपल्या दोघा सहकाऱ्यांच्या मदतीने मांडली होती. कंपनीने याचा आपल्या सीमच्या लोकप्रियतेसाठी वापर करून घेतलाच; शिवाय या विद्यार्थ्यांला कंपनीत मॅनेजरपदाची नोकरीही देऊ केली.
बिकम इंद्राज अ‍ॅडव्हाईजर
पेप्सिकोच्या या स्पर्धेच्या नावातच विद्यार्थ्यांना पुढे मिळणाऱ्या संधीचा आवाका किती मोठा आहे याची कल्पना येते. इंद्रा नुयी या भारतीय वंशाच्या असून पेप्सिको या जागतिक स्तरावरील कंपनीच्या सीईओ आहेत. इंद्रा यांच्या सल्लागार व्हा, असे आवाहन असलेल्या या स्पर्धेतून तावूनसुलाखून निघालेल्या उमेदवारांना मिळणारी संधीही मोठी असते.

कॅम्पस प्लेसमेंटलाही तितकेच महत्त्व
स्पर्धाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नोकरीविषयक संधी मिळत असतील तर ते स्वागतार्हच आहे. पण, उमेदवारांची या पद्धतीने निवड करण्याचा ट्रेंड सध्यातरी केवळ मोठमोठय़ा कंपन्यांपुरता मर्यादित आहे. कारण, राष्ट्रीय स्तरावर या प्रकारच्या मोठय़ा स्पर्धा आयोजिण्यासाठी लागणारे मनुष्यबळ, वेळ, खर्च हे करण्याची कुवत केवळ याच कंपन्यांकडे असते. त्यामुळे, आजही बी-स्कूलमधून कॅम्पस प्लेसमेंट हद्दपार झालेली नाही. फारच कमी वेळेत, मर्यादित साधनसामग्रीत शेकडो विद्यार्थ्यांच्या नियुक्त्या कॅम्पसमधून होत असतात. त्यामुळे, महाविद्यालयांमध्ये आजही कॅम्पस प्लेसमेंटला तितकेच महत्त्व आहे.
’  डॉ. अपूर्वा पालकर, कार्यकारी अध्यक्ष,
 ‘असोसिएशन ऑफ अनएडेड मॅनेजमेंट इन्स्टिटय़ूशन्स’
व्यवस्थापन महाविद्यालयांमध्ये ‘कॅम्पस इंटरव्ह्यू’ ही एक मोठी ‘इव्हेंट’ असते. मोठमोठय़ा कंपन्यांचे अधिकारी महाविद्यालयात प्रत्यक्ष येऊन विद्यार्थ्यांची ‘तयारी’ जोखत असतात. गुणवान आणि आत्मविश्वासू विद्यार्थ्यांसाठी ही मोठी संधी असते. कंपन्यांसाठीही ही मोठी सोय असते. परंतु ‘आक्रमक मार्केटिंग’च्या जमान्यात आता कंपन्यांनी आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. व्यवस्थापन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी एक स्पर्धा आयोजित करून विद्यार्थ्यांची ‘प्रॅक्टिकल’ तयारी किती आहे याचा अंदाज घेण्याचा हा नवीन फंडा आहे. यातून कंपन्यांना कल्पक, धाडसी आणि होतकरू उमेदवार मिळू लागले आहेत. तसेच ‘२५ लाखांच्या पॅकेजचे नका सांगू, पाच वर्षांनंतर माझी पोझिशन काय असेल त्याचा आराखडा आधी हातात ठेवा.’ असे आत्मविश्वासाने ठणकावून सांगणारे उमेदवार / विद्यार्थीही प्रकाशात येऊ लागले आहेत.