मुंबईला लाभलेल्या सुंदर समुद्रावर नौकेतून सैर घडवून अगदी तयार मासळी खाऊ घालण्याच्या प्रकारांना पर्यटकांनी चांगलीच दाद दिली. बोट पाटर्य़ा हादेखील पर्यटकांचा आवडता फंडा. परंतु प्रत्यक्ष मासेमारी करताना पर्यटन ही अनोखी सफर घडवून आणण्याची कल्पना वर्सोव्यातील तीन तरुणांनी मांडली आणि मेरिटाइम बोर्ड तसेच तटरक्षक दलाकडून परवानगी मिळवून पायलट प्रकल्प काही महिलांचा गट तसेच डॉक्टरांचा गट घेऊन अमलात आणली.
या सफरीत सामील झालेल्या प्रत्येकाला ही कल्पना भन्नाट आवडली. आतापर्यंत केवळ बोटीतून समुद्रात फिरता आले होते.. परंतु मासेमारी करताना पाहणे हा अनुभव वेगळा होता. मासेमारी ही किती जिकिरीची आहे, असे वाटल्यानंतर त्यापैकी एकाने चक्क प्रतिक्रिया दिली की, यापुढे मी मासे खरेदी करताना जास्त घासाघीस करणार नाही. प्रचंड मेहनत आणि नशिबावर मासळी मिळणे अवलंबून असते हे प्रत्यक्ष पाहिल्यावर तर मनाशी खुणगाठच बांधल्याची यापैकी प्रत्येकाची प्रतिक्रिया होती.
‘ऑल इंडिया फिशरमेन संघटने’चे सरचिटणीस राजहंस टपके, प्रवीण भावे आणि डॉ. चारुल भानजी या तीन मित्रांच्या पुढाकाराने हा प्रयत्न ‘ना नफा, ना तोटा’ प्रयत्नावर सुरू झाला आहे. मासळीच्या दिवसेंदिवस वाढणाऱ्या किमतींवरून कोळी भगिनींशी होणाऱ्या वादामुळे मस्त्य खवय्याला मासेमारी हा नेमका काय प्रकार आहे, याची कल्पना यावी, यासाठीच हा आटापिटा केल्याचे टपके यांनी सांगितले.  मासळीचा कमालीचा दुष्काळ, डिझेलवरील रद्द झालेले अनुदान, बोट बांधण्यासाठी येणारा खर्च, त्यावरील कर्मचाऱ्यांचा उदरनिर्वाह आदींमुळे ट्रॉलर मालक त्रस्त झालाय. एखादवेळी मासळी मिळाली तर पुन्हा ती कधी मिळेल, याची खात्री नसल्यामुळे बोट बांधण्यासाठी केलेला खर्च तसेच बँकेचे कर्ज फेडणेही मुश्कील झाले आहे. अशा वेळी मासेमारी पर्यटनाच्या मार्गातून या ट्रॉलरमालकांना काही उत्पन्न मिळू शकते, असे टपके यांनी सांगितले. गावठाणांचे अस्तित्वच आज संपुष्टात येत असून कोळी बांधवांच्या परंपरागत मासेमारी व्यवसायावरही गदा येत आहे. मासळीचा दुष्काळ असल्यामुळे सध्या खर्च वसूल करणेही ट्रॉलर मालकांना मुश्कील झाले आहे. अशा वेळी ही कल्पना असल्याचे आम्ही मेरिटाइम बोर्डाचे व्यवस्थापकीय संचालक आशीष सिंग यांना सांगितले आणि त्यांनीही लगेच हिरवा कंदील दिला. पर्यटकांची सुरक्षा महत्त्वाची असल्यामुळे लाइफ जॅकेट्सही आम्ही उपलब्ध करून दिली आहेत.
मासेमारीच्या बोटींवर त्यासाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे. मासेमारी करताना जे मासे मिळतील त्या ताज्या माशांचे कालवण बोटीवर देण्याची पद्धत पर्यटकांना खूप भावली आहे. असे ताजे मासे कधीच खायला मिळत नाहीत. मासे बाजारात येईपर्यंत साधरणत: चार-पाच दिवसांचा कालावधी असतो. त्यामुळे या काळात मासे बोटीवरील फ्रिजरमध्ये ठेवले जातात. परंतु मासेमारी करताना मिळालेल्या ताज्या माशांची चवच न्यारी असते आणि असे ताजे जेवणच या पर्यटनात दिले जाते, असेही टपके यांनी सांगितले. सुरुवातीला दहा महिलांचा आणि नंतर दहा डॉक्टरांचा एक गट या पर्यटनावर नेण्यात आला होता. यातील प्रत्येकाने पुन्हा येण्याचे कबूल करूनच अलविदा घेतला, असे डॉ. चारुल भानजी यांनी सांगितले.

योजना काय आहे?
’ वर्सोवा जेट्टीवरून बोटीचे प्रयाण
’ नरिमन पॉइंट टोकापासून १० सागरी मैल आतपर्यंत बोटीने प्रवास
’ जाताना व येताना प्रत्यक्ष मासेमारी
’ मासेमारीतून मिळालेले ताज्या माशांचे जेवण
’ वर्सोवा जेट्टीवर उतरताच मासळी बाजारात खरेदी