भूमिपूजन झालेल्या, शहरातील उड्डाणपुलाच्या प्रश्नावर नगरकरांच्या पदरी निराशाच पडली आहे. नजीकच्या काळात हा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता नसल्याचे आज झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या सभेतील चर्चेवरून व पालकमंत्री मधुकर पिचड यांनी दिलेल्या माहितीवरून स्पष्ट झाले. मात्र तरीही पुणे रस्त्यावर सुपे येथील टोल नाक्यावर, बेकायदा वसुली सुरू असल्याकडे लक्ष वेधत पारनेरमधील लोकप्रतिनिधींनी दुपारी टोल नाका बंद पाडला.
खा. दिलीप गांधी यांनी सभेत शहरातील उड्डाणपुलाच्या व बाहय़वळण रस्त्याच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले. शेंडी ते एमआयडीसी बाहय़वळण रस्त्यावरील खड्डे येत्या आठ दिवसांत बुजवण्यात येतील, असे आश्वासन बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिले. औरंगाबाद रस्ता ते मनमाड रस्त्यावरील बाहय़वळण रस्ता (तपोवन रस्ता) एका प्लॉटधारकाने खोदून ठेवल्याकडे आ. शिवाजी कर्डिले यांनी लक्ष वेधल्यावर पालकमंत्री पिचड यांनी जि.प. व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी ४ दिवसांत पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.
यावरील चर्चा इतरत्र भरकटली होती. ती खा. गांधी यांनी पुन्हा उड्डाणपुलाकडे वळवून याबाबत विविध हरकती घेतल्या. दौंड रस्त्याचे काम केंद्र सरकारच्या मदतीतून होण्यासाठी (व्हीजेएफ) महिनाअखेरीस प्रस्ताव पाठवण्याचे कार्यकारी अभियंता कैरे यांनी मान्य केले. आ. कर्डिले यांनीही मागील सभेत खैरे यांनी १५ दिवसांत उड्डाणपुलाचे काम झाले नाहीतर टोलवसुली बंद करण्याचे आश्वासन दिले होते, त्याचे काय झाले, असा प्रश्न उपस्थित केला. गांधी यांनी कोल्हापूरसारखी अवस्था होईल, असा इशाराही दिला. केडगाव भुयारी मार्ग, नारायण गव्हाणचा बाहय़वळण रस्ता, लाईट कटर आदी कामे अपूर्ण असतानाही टोलवसुली बेकायदा केली जात असल्याकडे आ. विजय औटी, जि.प. सदस्य विश्वनाथ कोरडे, सुजित झावरे यांनी लक्ष वेधत टोलवसुली बंद करण्याची मागणी केली.
उड्डाणपुलाचा ठेकेदार बदलण्यासाठी तसेच अर्थसंकल्पात तरतूद करण्यासाठी सरकारकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे, कामे अपूर्ण असली (९८ टक्के काम पूर्ण) तरी टप्पा-२च्या निविदेवेळीच राज्य सरकारने टोलवसुलीस परवानगी दिली होती, टोलवसुली बंद केली तर त्याचा बोजा सरकार व लोकांवरच पडेल, ठेकेदारास एकरकमी भरपाई द्यावी लागेल, असे स्पष्टीकरण कार्यकारी अभियंता खैरे यांनी दिले. अखेर पिचड यांनी यावर रविवारी (दि. १९) सकाळी बैठक घेऊ असे आश्वासन देऊन विषय निकाली काढला. नंतर पत्रकारांशी बोलतानाही पिचड यांनी उड्डाणपुलाविषयी आपल्याला सविस्तर माहिती नाही, अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊ, बांधकाममंत्री छगन भुजबळांशी बोलू, असे सांगितले.
सुप्याचा टोलनाका बंद!
दरम्यान, सभेत टोलवसुली बंद न झाल्यास, सभा संपल्यावर आम्ही तेथे जाऊन टोलवसुली बंद करणार असल्याचा इशारा आ. औटी, जि.प. सदस्य कोरडे व झावरे यांनी दिला होता. तिघेही कार्यकर्त्यांसह तेथे गेले. कार्यकारी अभियंता खैरेही उपस्थित होते. टोल नाक्यावरील व्यवस्थापक ठाकूर व डोगरा यांना बेकायदा वसुली बंद करण्यास सांगितले. त्यानुसार दुपारी २ नंतर टोलनाका बंद झाल्याची व रविवापर्यंत टोलनाका बंदच राहणार असल्याची माहिती कोरडे यांनी दिली.