लोकशाहीचा चौथा स्तंभ अशी ओळख असलेल्या पत्रकारितेची आता व्यावसायिकतेकडे वाटचाल होत असल्याची खंत ज्येष्ठ पत्रकार एस. एन. विनोद यांनी व्यक्त केली. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, टिळक पत्रकार भवन ट्रस्ट व नागपूर श्रमिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय पत्रकार दिन कार्यक्रमात ते बोलत होते.
माहिती व जनसंपर्क विभागाचे संचालक मोहन राठोड, टिळक पत्रकार भवन ट्रस्टचे उपाध्यक्ष विनोद देशमुख, सरचिटणीस शिरीष बोरकर व नागपूर श्रमिक पत्रकार संघाचे सरचिटणीस अनुपम सोनी व्यासपीठावर उपस्थित होते. ‘जनहित सेवांमध्ये प्रसार माध्यमांची भूमिका’ या विषयावर बोलताना विनोद म्हणाले, समाजाचा आरसा मानले जाणारे हे माध्यम समाजालाच विसरले असून पत्रकारिता हरविली आहे. स्वातंत्र्यापूर्वी पत्रकारिता हे मिशन होते. स्वातंत्र्याच्या लढय़ात या माध्यमांनी मोठय़ा जबाबदारीने कर्तव्य पार पाडले. सध्या हे क्षेत्र व्यवसायात उतरले आहे. देशाच्या दुर्दशेसाठी राजकारण्यांबरोबरच पत्रकारही तेवढेच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. पत्रकारिता ही सेवा राहिली नसून आता तिचे व्यावसायिकतेकडे मार्गक्रमण होत आहे. या क्षेत्रात येणाऱ्या तरुणांनी पत्रकारितेची परिभाषा समजून भयमुक्त पत्रकारिता करावी, असा सल्लाही त्यांनी दिला. कार्यक्रमाचे संचालन सहायक माहिती संचालक शैलजा दांदळे यांनी केले. विश्वास इंदूरकर यांनी आभार मानले. जिल्हा माहिती अधिकारी अनिल ठाकरे याप्रसंगी उपस्थित होते.