उद्यापासून योजना कार्यान्वित
धावपळीच्या जीवनशैलीत ग्रंथालयांमध्ये येऊन पुस्तक बदलण्यात वाचकांना पुरेसा वेळ मिळत नसल्याने आता एका व्हॅनद्वारे पुस्तकेच घरोघरी नेण्याचा उपक्रम राबविण्याचा निर्णय १२१ वर्षांची परंपरा असणाऱ्या ठाणे मराठी ग्रंथसंग्रहालयाने घेतला आहे. गुरुवार, २६ जून रोजी ही योजना कार्यान्वित होणार आहे. वाचकवृद्धीसाठी फिरत्या गाडीचा अभिनव प्रयोग राबवणारे ठाणे ग्रंथसंग्रहालय ही महाराष्ट्रातील पहिली संस्था ठरणार आहे.
गेल्या काही वर्षांत ठाणे शहर कमालीचे विस्तारले आहे. १२ किलोमीटरच्या परिघात १३० प्रभागांमधून तब्बल २० लाख ठाणेकर राहतात. त्यामुळे घरातून नियमितपणे ग्रंथालयात पुस्तक बदलण्यासाठी येणे वाचकांना अशक्य होऊ लागले आहे. रिक्षांचा अभाव, वाहतुकीचे वाढते दर यामुळेही ग्रंथालयात वाचक येईनासे झाले होते. त्यामुळे ग्रंथालयाची वाचक संख्या रोडावली होती. त्यामुळे बदलत्या काळात वाचन संस्कृती टिकविण्यासाठी ग्रंथालयाने हा निर्णय घेतला आहे. ठाणे मराठी ग्रंथ संग्रहालय २००६ पासून ही योजना राबविण्याचा प्रयत्न करीत होती. मात्र पुरेशा निधीअभावी त्याला मूर्त रूप आले नव्हते. मात्र २०१० मध्ये साहित्य संमेलनाच्या आयोजनातून संस्थेकडे मोठा निधी उपलब्ध झाल्याने हा उपक्रम राबविता आल्याचे ग्रंथालयाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. अध्यक्ष माधव गोखले, कार्याध्यक्ष राजेंद्र वैती, कार्यवाह विद्याधर वालावलकर, दा. कृ. सोमण यांनी या उपक्रमाची माहिती दिली.गुरुवार, २६ जून रोजी दुपारी १२ वाजता ठाणे महापालिका आयुक्त असीम गुप्ता यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन होणार असून महापौर हरिश्चंद्र पाटील, आमदार एकनाथ शिंदे कार्यक्रमास उपस्थित राहतील, अशी माहिती ठाणे मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या वतीने देण्यात आली आहे.

असे आहे ग्रंथयान..
या फिरत्या ग्रंथयानात विविध कपाटांमधून चार हजार पुस्तके, वातानुकूलित यंत्रणा, पंखे आणि तीन-चार वाचकांना बसण्याची सोय आहे. या ग्रंथयानासाठी सुमारे २५ लाखांचा खर्च आला आहे. गाडीमध्ये चालक-वाहकासह एक उपग्रंथपाल असणार असून त्यांच्याकडे ग्रंथालयातील पुस्तकांची परिपूर्ण माहिती उपलब्ध असणार आहे. सुरुवातीला शहरातील २५ ठिकाणी ही गाडी थांबणार आहे. घोडबंदर रोड, पोखरण नं. १, २, उपवन, कोलबाड, एलबीएस मार्ग, कळवा, खारेगांव, मुंब्रा आदी ठिकाणी ही गाडी आठवडय़ातील सातही दिवस फिरणार असून सकाळ, दुपार आणि संध्याकाळ दोन ते तीन तास ही गाडी एका ठिकाणी राहणार आहे.