रेल्वेच्या तिकीट खिडक्यांवर सुट्टय़ा पशांवरून रेल्वे कर्मचारी आणि प्रवासी यांचा वाद, ही नेहमीचीच गोष्ट आहे. या वादाचे पर्यवसान अनेकदा भांडणात होऊन रेल्वेचे नुकसान होण्याच्या घटनाही घडलेल्या आहेत. या सर्व वादाला फाटा देण्यासाठी आणि प्रवाशांना योग्य तिकीट तातडीने तेदेखील कोणत्याही सुट्टय़ा पशांच्या अडचणीविना मिळवून देण्यासाठी लवकरच एक नवीन पर्याय उपनगरीय लोकल प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. या पर्यायामुळे उपनगरीय तिकीट डेबिट कार्डद्वारे काढणे शक्य होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना लागणारा वेळ, स्मार्ट कार्डवरील अवलंबलेपण आदी गोष्टी दूर होणार आहेत.
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आपल्या रेल्वे अर्थसंकल्पीय भाषणात डेबिट कार्डद्वारे उपनगरीय रेल्वे तिकीट देण्याबाबत घोषणा केली. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात मुंबईत त्यांच्याच हस्ते मोबाइल तिकीट प्रणालीचेही लोकार्पण झाले. मोबाइल तिकीट प्रणालीला अद्यापही म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. यात आर वॉलेट या संकल्पनेचा हातभार जास्त आहे. त्यामुळे आता रेल्वे डेबिट कार्ड स्वीकारणारी एटीव्हीएम मशिन्स तयार करण्याच्या वाटेवर आहे.
या मशिनमध्ये प्रवाशांकडे असलेल्या बँकेच्या डेबिट कार्डचा वापर करता येणार आहे. एटीएम मशिनप्रमाणे केवळ कळीचा शब्द (पासवर्ड) टाकून हव्या त्या स्थानकापर्यंतची तिकिटे प्रवासी काढू शकतील. यात एकेरी आणि दुहेरी प्रवास अशा दोन्ही सुविधा असतील. सध्या आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर नोंद असेल, तर डेबिट कार्डचा वापर करून ऑनलाइन तिकीट काढता येऊ शकते. मात्र अद्याप एटीव्हीएमवरून तिकीट काढण्यासाठी डेबिट कार्ड वापरणे शक्य नाही.
रेल्वे आता नेमक्या याच गोष्टीवर भर देणार आहे. डेबिट कार्डद्वारे तिकीट काढण्यासाठी प्रवाशांना सुटे पसे बाळगावे लागणार नाहीत. त्याचप्रमाणे स्मार्ट कार्ड विकत घेण्याचीही गरज नाही. तिकिटाच्या रकमेएवढी रक्कम प्रवाशांच्या बँकेच्या खात्यातून परस्पर रेल्वेकडे जमा होणार आहे. तसेच बँकेच्या खात्यात पुरेशी रक्कम नसल्यास तिकीट दिले जाणार नाही, असेही एका रेल्वे अधिकाऱ्याने स्पष्ट केले.