आपले काम केवळ शहरातील कायदा-सुव्यवस्थेपुरते मर्यादित न मानता समाजोपयोगी उपक्रमांद्वारे उपेक्षितांना दिलासा देण्याची जबाबदारीही आता मुंबई पोलिसांनी शिरावर घेतली आहे. शहरातील अनाथ, गरीब, उपेक्षित अशा १०२ मुलांना दत्तक घेऊन पोलिसांनी आपण या जबाबदारीबाबत किती गंभीर हे दाखवून दिले आहे. ही मुले अनाथ, रस्त्यावर कचरा वेचणारी किंवा अत्यंत गरीब घरातील आहेत. वेश्यांच्या वस्तीतील १९ मुलांचाही यात समावेश आहे. सामान्य मुलांना मिळणाऱ्या शैक्षणिक व अन्य सुविधांपासून ही मुले वंचित असतात. घरातील संस्कार, मार्गदर्शन यांचा तर त्यांच्या आयुष्यात अभावच असतो. एकवेळ पैशाने शैक्षणिक सुविधा मिळविता येतात. पण, संस्कार कुठून मिळवायचे. घरचे वातावरणच दूषित असल्याने यातली बहुतांश मुले मग गुन्हेगारीकडे वळतात. या प्रकारचा गुन्हेगारीचा समाजशास्त्राच्या दृष्टिकोनातून अभ्यास फारच थोडय़ा पोलीस अधिकाऱ्यांनी आतापर्यंत केला आहे. त्याही पुढे जाऊन सामाजिक प्रश्नांवर तोडगा सुचविण्याचे प्रयत्न तर अभावानेच केलेले आढळतात. नेमकी हीच उणीव भरून काढण्याचा प्रयत्न पोलिसांची समाजसेवा शाखा करते आहे. शिक्षणाअभावी इथेतिथे भटकणाऱ्या मुलांच्या गरजा ओळखून त्यांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्याची ही कल्पना पोलीस उपायुक्त बी. जी. शेखर यांनी प्रत्यक्षात आणली आहे. सामाजिकदृष्टय़ा संवेदनशील असलेले पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग यांनी अशा उपक्रमांना नेहमीच सहकार्य दिले आहे. त्यामुळे, शेखर यांच्या प्रयत्नांनाही चांगले अवकाश मिळाले. काही पोलीस अधिकाऱ्यांनीही काही मुलांना दत्तक घेऊन या उपक्रमाला आर्थिक हातभार लावला आहे. भविष्यात एक हजार मुलांना या प्रकारचे सहकार्य उपलब्ध करून देण्याची योजना आहे. मात्र त्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींच्या पुढाकाराची आणि मदतीची गरज असल्याचे शेखर यांनी नमूद केले. ‘प्रथम’, ‘प्रेरणा’, ‘टीम चॅलेंजेस’, ‘चाईल्डलाइन’ आदी स्वयंसेवी संस्था आणि समाजातील दानशूर व्यक्तींच्या मदतीने हा उपक्रम तडीस नेला जाणार आहे. यात पहिलीपासून बारावीपर्यंतच्या वर्गात शिकणाऱ्या या मुलांच्या शाळेच्या शुल्कापासून त्यांना लागणाऱ्या सर्व शैक्षणिक वा अन्य वस्तूंच्या खर्चाची जबाबदारी पोलिसांनी घेतली आहे. या सगळ्याकरिता प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मागे किमान १० ते १५ हजार रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. ही रक्कम विद्यार्थ्यांच्या आणि मुख्याध्यापकांच्या नावे संयुक्तपणे काढलेल्या खात्यावर बँकेत जमा केली जाईल आणि त्यातून मुलांना वर्षभर लागणारा खर्च केला जाईल, अशी माहिती शेखर यांनी दिली. या शिवाय या मुलांच्या शैक्षणिक व सामजिक जडणघडणीसाठी त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन, समुपदेशन, प्रशिक्षणही स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले जाणार आहे. या उपक्रमाला सहकार्य करू इच्छिणाऱ्यांसाठी संपर्क – सहाय्यक पोलिस निरीक्षक नारकर – ९९६७०२१९७१