जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांना संरक्षण कुंपणाचे निधी वितरण वादंगाचे झाले आहे. पूर्वी निधी मिळूनही तो पडून राहिल्याने वाद झाले होते. आता तो वितरित करताना राजकीय दुजाभाव दाखवल्याची तक्रार आहे. संरक्षण कुंपणाचा निधी वितरित करताना अध्यक्ष व उपाध्यक्ष या दोघांनी जाणीवपूर्वक काँग्रेस सदस्यांचे प्रस्ताव डावलल्याचा आरोप परमेश्वर पांडुळे यांनी जाहीरपणे केला आहे. परवा (शनिवारी) होणाऱ्या डीपीसीच्या सभेत व दि. मंगळवारी (दि.२२) होणाऱ्या जि. प. सर्वसाधारण सभेत याचा जाब विचारू असा इशाराही त्यांनी पत्रकार परिषदेत दिला.
पक्षीय भूमिका न ठेवता सदस्यांना निधीचे समान वाटप करण्याची जिल्हा परिषदेची परंपरा असताना अध्यक्ष विठ्ठलराव लंघे व उपाध्यक्ष मोनिका राजळे यांनी या परंपरेला छेद दिला आहे. राजकीय दुजाभाव दुर्दैवी आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर जागा वाटपाचा निर्णय झाला नसताना आघाडीला खीळ पाडणारे धोरण राबवले जात आहे, यााबाबत आपण पक्षश्रेष्ठींकडे व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे पांडुळे यांनी सांगितले.
जिल्हा नियोजन मंडळाकडून प्राथमिक शाळांच्या कुंपणासाठी मार्चमध्ये सुमारे ३ कोटी रुपयांचा निधी मिळाला, मात्र प्रस्ताव सादर होऊनही त्याचे गेल्या सहा महिन्यांत वितरणच झाले नव्हते, यावरून सभापती बाबासाहेब तांबे यांनी उपोषणाचाही इशारा दिला होता. आता निधी वितरणावरून वादंग झाले आहे. यासंदर्भात माहिती देताना पांडुळे यांनी सांगितले, की ३ कोटी रुपयांमध्ये ६७ शाळांसाठी कुंपण मंजूर करण्यात आले, मात्र त्यात बहुसंख्य राष्ट्रवादीच्याच सदस्यांचे प्रस्ताव आहेत, राष्ट्रवादीच्या एका सदस्याच्या गटात दोन-दोन, तीन-तीन प्रस्तावांना निधी देण्यात आला. तर काँग्रेसच्या केवळ ७ सदस्यांच्या गटात निधी देण्यात आला. त्यातही केवळ शिक्षण समितीतील सदस्यांना प्राधान्य दिले गेले आहे.
निधीचे वाटप करताना राज्यमार्ग व कॅनॉललगतच्या शाळांना प्राधान्य देण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली होती, त्याकडे दुर्लक्ष करत अध्यक्ष व उपाध्यक्षांनी आपल्या मनाप्रमाणे वाटप केले आहे. याबाबत आपण उपाध्यक्ष राजळे यांना भेटलो, परंतु त्यांनी केवळ तोंडाला पाने पुसली. अनेक सदस्यांना मंजूर यादीची माहिती नाही, परंतु यावरून सर्वसाधारण सभेत सदस्यांचा उद्रेक होणार आहे, तसेच डीपीसीच्या सभेत पालकमंत्र्यांनाही जाब विचारला जाईल, असा इशारा पांडुळे यांनी दिला आहे.