तोट्यात चाललेल्या बेस्टच्या परिवहन विभागाला फायद्यात आणण्यासाठी बेस्टचे महाव्यवस्थापक डॉ. जगदीश पाटील यांनी एकापेक्षा एक योजना आखण्यास सुरुवात केली आहे. एनएसएस विद्यार्थ्यांच्या मदतीने प्रवाशांना भावनिक आवाहन करण्यापासून ते दर रविवारी आगारांत प्रवासी व अधिकारी यांचा संवाद घडवून आणण्यापर्यंत अनेक क्लृप्त्या महाव्यवस्थापक वापरत असून त्यात आणखी एका योजनेची भर पडली आहे. या योजनेअंतर्गत बेस्ट आता आपल्या गाड्या खासगी तसेच काही सरकारी कार्यालयांच्या सेवेत देणार आहे. या सेवेमार्फत या कंपन्यांचे कर्मचारी बेस्टचा मासिक किंवा सहामाही पास काढणार असून बेस्ट त्यांना खास सेवा पुरवणार आहे. याबाबत बॉम्बे पोर्ट ट्रस्टशी बोलणे झाले असून सीप्झमधील काही कंपन्यांसह चर्चा चालू आहे.
बेस्टच्या परिवहन विभागाची आíथक स्थिती वर्षांगणिक खालावत आहे. त्यातच बेस्टचे प्रवासी भारमान ४५ लाखांवरून ३० लाखांवर आले आहे. त्यामुळे बेस्ट प्रशासन सचिंत असून ही परिस्थिती सुधारण्यासाठी काय काय उपाययोजना करता येतील, याची चाचपणी चालू आहे. त्यासाठीच अधिकारी व प्रवासी यांची बठक, प्रवाशांना भावनिक आवाहन आदी उपक्रम बेस्टने सुरू केले आहेत. त्याचबरोबर बेस्टसाठी राखीव माíगकेचा पर्याय निवडून बेस्टचा प्रवास अधिक वेगवान व विना अडथळा करण्याचेही प्रयत्न बेस्ट करत आहे. याच प्रयत्नांचा भाग म्हणून बेस्ट उपक्रम आता काही खासगी कंपन्या व सरकारी कार्यालये यांच्या कर्मचाऱ्यांना खास सेवा देण्याच्या प्रयत्नात आहे.
सीप्झ येथील अनेक कंपन्यांचे कर्मचारी खासगी कंपन्यांमधून ये-जा करतात. येथील हिरे व्यापार जोरात असून त्या कर्मचाऱ्यांना सुरक्षित प्रवासाची गरज असते. त्यासाठी बेस्ट उपक्रमाने या कंपन्यांसह चर्चा सुरू केली आहे. या कर्मचाऱ्यांनी बेस्टचा मासिक-त्रमासिक-सहामाही पास काढावा, यासाठी सीप्झ भागात एक छोटे कार्यालयही सुरू केले आहे. लवकरच बेस्ट या कर्मचाऱ्यांसाठी खास सेवा सुरू करेल, अशी माहिती बेस्टच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. त्याशिवाय मुंबई (बॉम्बे) पोर्ट ट्रस्टच्या कर्मचाऱ्यांसाठीही ठरावीक वेळेत सेवा देण्याचा प्रस्ताव चच्रेत आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यास मुंबई पोर्ट ट्रस्टच्या आवारात बेस्ट सेवा चालेल. पोर्ट ट्रस्टच्या कामाच्या इमारतील लांब असल्याने तिथपर्यंत कर्मचाऱ्यांची ने-आण करण्यासाठी या सेवांचा उपयोग होईल. तसेच कर्मचाऱ्यांनाही रास्त दरांत सुरक्षित वाहतूक पर्याय उपलब्ध होईल. या सर्वाचा फायदा बेस्ट उपक्रमाच्या परिवहन विभागाला मोठ्या प्रमाणात होणार असल्याचे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.