ई-बुकचे आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजाजन भास्कर मेहेंदळे लिखित ‘शिवाजी-हिज लाइफ अ‍ॅण्ड टाइम्स’ हा चरित्र ग्रंथ आता ई-बुक स्वरूपात प्रकाशित होत असून तो आयफोन आणि आयपॅडवरही वाचता येणार आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते त्यांच्या ‘वर्षां’या निवासस्थानी बुधवार १ मे रोजी एका समारंभात हे प्रकाशन होणार आहे. परममित्र प्रकाशन संस्थेने हा ग्रंथ प्रकाशित केला आहे.
मुद्रित स्वरूपातील हा ग्रंथ गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात प्रकाशित झाला होता. मेहेंदळे यांनी अथक परिश्रम आणि अनेक कागदपत्रांचा अभ्यास करून हा ग्रंथ लिहिला आहे. एक हजार पृष्ठांचा हा ग्रंथ आता ई-बुक स्वरूपात प्रकाशित होत असल्याने महाराजांचे चरित्र परदेशातही पोहोचण्यास मदत होणार असल्याचे ‘परममित्र प्रकाशन’संस्थेचे माधव जोशी यांनी सांगितले.
शिवाजी महाराजांच्या आयुष्यात घडलेल्या विविध घटना आणि प्रसंगांचे वस्तुनिष्ठ पुरावे कागदपत्रांसह यात देण्यात आले असल्याचे सांगून जोशी म्हणाले की, लोकमान्य टिळक यांना मिळालेले ‘जेधे शकावली’, शिवाजी महाराजांची जन्मपत्रिका, त्यांनी केलेला पत्रव्यवहार आदी महत्त्वाच्या गोष्टी या ग्रंथात आहेत. या ग्रंथाचे खास वैशिष्टय़ म्हणजे मेहेंदळे यांनी शिवाजी महाराज हे ‘राजा’ म्हणून कसे श्रेष्ठ होते, त्याचबरोबर लष्करीदृष्टय़ा महाराजांचे श्रेष्ठत्व, कर्तव्यदक्ष प्रशासकीय अधिकारी म्हणून त्यांचे गुण ग्रंथात सांगितले आहेत.
बुधवारी दुपारी एक वाजता ई-बुक आवृत्तीचे प्रकाशन हे थेट आयपॅड आणि आयफोनवर होणार असून जगातील ५१ देशात हा ग्रंथ पोहोचणार आहे. http://itunes.apple.com/us/book/shivaji-his-life-and-times/id637464051?mt=11 अशी याची लिंक आहे.