22 August 2019

News Flash

स्मार्टफोनकडून फिचरफोनकडे..

स्मार्टफोनचा संदेश आल्यावर वाजणाऱ्या शिट्टीमध्ये आता साध्या अर्थात फिचर फोनच्या संदेश संकेताची धूनही पुन्हा ऐकू येणार आहे.

| August 29, 2015 04:49 am

स्मार्टफोनचा संदेश आल्यावर वाजणाऱ्या शिट्टीमध्ये आता साध्या अर्थात फिचर फोनच्या संदेश संकेताची धूनही पुन्हा ऐकू येणार आहे. स्मार्टफोनच्या गर्दीत लाखो लोकांची गरज असलेल्या फिचर फोनकडे कंपन्यांचेही दुर्लक्ष झाले होते. मात्र ग्राहकांची गरज लक्षात घेऊन स्मार्टफोन विकसित करणाऱ्या कंपन्यांनी पुन्हा फिचर फोन बाजारात आणण्यास सुरुवात केली आहे.देशात सर्वत्र स्मार्टफोनचा बोलबाला असला तरी अद्याप १५ टक्के मोबाइल वापरकर्त्यांपर्यंतच स्मार्टफोन पोहचला आहे. म्हणजे सुमारे ८५ टक्के मोबाइल वापरकर्ते आजही साधे फोन अर्थात फिचर फोन वापरतात. अर्थात यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असली तरी आजही इतका मोठा ग्राहक सोडणे कंपन्यांना परवडणारे नाही. यामुळे ज्या कंपन्यांकडे फिचर फोन उत्पादनाचा अनुभव आहे अशा कंपन्या पुन्हा फिचर फोनच्या उत्पादनात लक्ष घालू लागल्या आहेत. गेल्या ऑगस्ट महिन्यात सॅमसंग आणि मायक्रोसॉफ्ट अशा दोन बडय़ा मोबाइल उत्पादकांनी पुन्हा एकदा फिचर फोन बाजारात दाखल केले आहे. यापैकी सॅमसंगचा फोन भारतीय बाजारात दाखल झाला असून मायक्रोसॉफ्टचा नोकिया लवकरच दाखल होणार आहे. या नव्याने दाखल झालेले फोन अगदी जुन्या फोनसारखे मुलभूत सुविधा असलेले नसून त्यात स्मार्टफोनमध्ये असणाऱ्या काही गोष्टी उपलब्ध करून दिल्या आहेत. म्हणजे या फोनमध्ये बा’ा साठवणुकीची क्षमता अतिरिक्त देण्यात आली आहे. याचबरोबर यामध्ये एमपीथ्री आणि एमपीफोर प्लेअर्सही देण्यात आले आहेत.भारत हे कोणत्याही कंपनीसाठी मोठी बाजारपेठ असून या बाजारपेठेत आम्हाला सगळय़ा स्तरावरील ग्राहकांची गरज पुरवायची असते यामुळे फिचर फोन बाजारात आणणे योग्य ठरत असल्याचे सॅमसंगचे इंडिया इलेक्ट्रॉनिक्सचे विपण व आयटी आणि मोबाइल विभागाचे उपाध्यक्ष असिम वारसी यांनी लोकसत्ताशी बोलताना स्पष्ट केले. देशात आजही फिचर फोनला मागणी आहे. अर्थात ही मागणी तुलनेत कमी असली तरी त्या विभागाचा ग्राहक खूप मोठा आहे. यामुळे त्याची गरज भागविणे हे कंपनीचे कर्तव्य असल्याचेही वारसी म्हणाले.सॅमसंगने मेट्रो बी३५०ई हा फोन बाजारात आणला असून मायक्रोसॉफ्टने नुकताच नोकिया २२२ या फोनचे अनावरण केले आहे. सॅमसंगचा फोनमध्ये बा’ा साठवणूक क्षमता १६ जीबीपर्यंत देण्यात आली असून यात दोन मेगापिक्सेलचा कॅमेराही देण्यात आला आहे. याशिवाय एमपीथ्री प्लेअर, एफएम रेडिओ, इंटरनेट ब्राऊजर आणि १२०० एमएएचची बॅटरी पॉवर सेविंग मोडसह देण्यात आली आहे. हा फोन सॅमसंग इंडियाच्या संकेतस्थळावर २६५० रुपयांना उपलब्ध आहे. तर इतर ई-मार्केटिंग संकेतस्थळावर याहीपेक्षा स्वस्त उपलब्ध आहे. नोकियाच्या फोनमध्येही ११०० एमएएचची बॅटरी आणि एमपीथ्री प्लेअर व एफएम रेडिओ उपलब्ध आहे. या फोनची किंमत ३७ अमेरिकन डॉलर्स असून भारतात तो अंदाजे २४५० रुपयांपर्यंत उपलब्ध होऊ शकेल. येत्या सप्टेंबर महिन्यात हा फोन बाजारात दाखल होईल असे समजते.

First Published on August 29, 2015 4:49 am

Web Title: now smart phone company thinking about feature phones
टॅग Smart Phone