शहरतील महाजन मळ्यातून शनिवारी पहाटे अज्ञात चोरटय़ांनी सुमारे साठ हजार रूपये किंमतीचा १ हजार ५०० किलो कांदा चोरून नेला. शहर परिसरात कांदा चोरीची या आठवडय़ातील ही दुसरी घटना असून त्यामुळे शेतकऱ्यांची झोप उडाली आहे.
शिवाजी नाना चौधरी यांनी महाजन मळा येथील शेतीत दीड एकरावर कांदा लागवड केली असून परीपक्व झालेल्या सुमारे तीन हजार किलो कांद्याची त्यांनी शुक्रवारीच काढणी केली. शनिवारी तो बाजारात विक्र्रसाठी नेण्यात येणार होता. तत्पुर्वीच पहाटे चोरटय़ांनी त्यांच्या मळ्यातून सुमारे दीड हजार किलो कांदा चोरू नेला. वाहनात भरून हा कांदा लांबवण्यात आला. या वाहनाच्या खुणा तेथे दिसतात. दोन, तीन वाहनांमधून हा कांदा लांबवण्यात आला असावा असा अंदाज व्यक्त होतो. चौधरी कुटूंबियांना शनिवारी सकाळी हा प्रकार लक्षात आला.
दरम्यान गेल्या मंगळवारीही शांताराम मते यांच्या शेतातून अशाच प्रकारे कांदा चोरून नेण्यात आला. या चोऱ्यांमागे स्थानिक चोरटय़ांचाच हात असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कांद्याच्या या चोऱ्यांमुळे तालुक्यात खळबळ उडाली असून शेतकरी चिंताग्रस्त आहेत.