मुंबईत होते तेव्हा गुंडांचे राज्य
शासकीय किंवा खासगी मालकीचे भूखंड बळकावून आणि शासकीय व निमशासकीय यंत्रणांशी ‘अर्थ’पूर्ण संबंध ठेवून मुंबई शहरात आणि उपनगरात अनेक बेकायदा इमारती, झोपडपट्टय़ा, चाळी बांधल्या जात होत्या, जात आहेत आणि यापुढेही बांधल्या जातील. या सर्व गोष्टी करण्यासाठी कमालीची ‘गुप्तता’ पाळावी लागते. मुंबई सेंट्रलसारख्या मध्यवर्ती भागातील घोडय़ांच्या तबेल्यांची जागा बळकावून तेथे गगनचुंबी इमारती उभ्या राहू शकतात, हे कोणाला ‘पटेल’का? हो, पण तसे घडले आहे.
‘कॅम्पा कोला’च्या पाश्र्वभूमीवर असे अनेक किस्से आता समोर येऊ लागले आहेत. मुंबई महापालिकेतील माजी नगरसेवक रमेश जोशी यांनी मुंबई सेंट्रल येथे उभारण्यात आलेल्या तीन गगनचुंबी इमारतींचा किस्सा ‘वृत्तान्त’ला सांगितला. त्या वेळी आपण हा विषय महापालिकेत जोर लावून धरला होता. सततच्या पाठपुराव्यामुळे तत्कालीन महापालिका आयुक्त सदाशिव तिनईकर यांनीही कठोर भूमिका घेत या इमारतींचे वीज आणि पाणी धाडसाने तोडले होते, अशी आठवण सांगितली. या इमारतींच्या परिसरात घोडय़ाचे तबेले होते. मात्र ‘मनी’ आणि ‘मसल’पॉवरच्या जोरावर ते रिकामे करून घेऊन इमारती बांधण्यात आल्या. नागपाडा येथे १८ मजल्यांची गगनचुंबी इमारत उभारण्यात आली. प्रत्यक्षात महापालिकेकडून फक्त आठ मजल्यांच्या बांधकामालाच परवानगी मिळाली होती. मुंबई सेंट्रल येथे एक अपार्टमेंट आणि हॉटेलचेही बांधकाम अशाच प्रकारे करण्यात आले होते. सर्व कागदपत्रे व अन्य तपशिलाच्या आधारे महापालिकेत हे न ‘पटेल’ असे आणि ‘गुप्तता’ राखलेले हे प्रकरण उघड केले. त्या वेळी तिनईकर आपल्या कर्तव्याला जागले आणि त्यांनी या इमारतींची वीज, पाणी जोडणी आणि मलनिस्सारण जोडणी तोडण्याचे आदेश दिले. महापालिका प्रशासनाने तशी कारवाई केली. सुमारे वर्ष ते दीड वर्ष त्या इमारतींना पाणी, वीज काहीही नव्हते. पुढे संबंधितांनी ‘तांत्रिक’ बाबी पूर्ण करून ते पुन्हा सुरू करून घेतले ही बाब अलाहिदा.
या प्रकरणी संबंधित वास्तुरचनाकाराच्या विरोधात कारवाई केली जावी म्हणून आपण वास्तुरचनाकारांच्या संघटनेकडे पत्रही पाठवले होते. मात्र संघटनेवर कारवाई करण्याचे बंधन नाही, असे उत्तर त्यांच्याकडून मिळाल्याचेही जोशी यांनी सांगितले.