नवी मुंबई महापौर पदाची निवडणूक आता निर्विवाद पार पडण्याची चिन्हे दिसू लागल्याने शिवसेनेत विरोधी पक्षनेते व सर्व पक्षांत स्वीकृत सदस्यांसाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. शिवसेनेत बरेच दिग्गज नगरसेवक निवडून आल्यानंतर या पदावरून सुदोपसुंदी सुरू झाली आहे. विरोधी पक्षनेते पदासाठी माजी जिल्हाप्रमुख विजय चौगुले व माजी सिडको संचालक नामदेव भगत यांची नावे आघाडीवर आहेत. कोपरखैरणे येथील शिवराम पाटील यांनीही या पदावर दावा ठोकला आहे.
नवी मुंबई महापौर पदासाठी लागणारी ५७ नगरसेवकांची कुमक राष्ट्रवादी काँग्रेसने जमा केली आहे. त्या नगरसेवकांचे तसे प्रतिज्ञापत्र कोकण विभागीय आयुक्तांकडे सुपूर्द केले आहे. हे सोपस्कार पूर्ण करून महापौर निवडणूक होईपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्ष नगरसेवक श्रमपरिहारासाठी सहलीला तसेच देवदर्शनाला बाहेर गेले आहेत. या नगरसेवकांच्या सेवेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गणेश नाईक यांचे छोटे बंधू ज्ञानेश्वर नाईक, खंदे समर्थक सुरेश कुलकर्णी आदी मंडळी या नगरसेवकांना घेऊन वेगवेगळ्या पर्यटनस्थळांकडे रवाना झाले आहेत. ते आता निवडणुकीच्या दिवशी अवतरणार आहेत. शिवसेनेच्या नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसवेक फोडण्याची भीती दाखविल्याने ही खबरदारी घेण्यात आली आहे. स्पष्ट बहुमतासाठी लागणारा ५६ आकडा पार केल्याने आता राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणारी काँग्रेसची कुमक ही बोनस ठरणार आहे. दोन दिवसांत काँग्रेस आपल्या पाठिंब्याचे पत्र कोकण विभागीय आयुक्तांकडे सादर करणार आहे.
९ मे रोजी होणाऱ्या महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीनंतर लगेचच विरोधी पक्षनेत्याची निवड केली जाणार आहे. ती नियुक्त होणारे महापौर जाहीर करणार असून त्यासाठी सेनेत रस्सीखेच सुरू झाली आहे. यात माजी जिल्हाप्रमुख व ऐरोली परिसरात आपले वर्चस्व निर्विवाद सिद्ध करणारे विजय चौगुले यांचे नाव आघाडीवर आहे. पण त्यांना मातोश्री व उपनेते विजय नाहटा यांचा विरोध असल्याचे समजते. अशा वेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा शब्द प्रमाण मानला जाण्याची शक्यता आहे. शिंदे यांच्यामुळेच चौगुले शिवसेनेत असून ते त्यांच्यासाठी प्रयत्न करणार आहेत. याशिवाय माजी सिडको संचालक नामदेव भगत व शिवराम पाटील प्रयत्नशील आहेत. नाहटा यांचे निकटवर्ती व सत्ता आल्यास महापौर पदाची स्वप्न पाहणारे नगरसवेक संजू वाडे यांनीही आपले घोडे पुढे दामटवले आहेत.
स्वीकृत नगरसेवक पदासाठी सत्ताधारी पक्षातील पराभूत उमेदवार अनंत सुतार, राजू शिंदे, माजी उपमहापौर भरत नखाते, शशिकांत बिराजदार, शिवसेना-भाजप युतीत विठ्ठल मोरे, अतुल कुलकर्णी, मनोहर गायखे यांची नावे चर्चेत आहेत. साडेबावीस नगरसेवकांच्या मागे एक नगरसेवक असे पाच नगरसेवक नियुक्तीमागे गणित असून भाजप व काँग्रेसला मित्रपक्षांना मदत करण्यावाचून दुसरा पर्याय नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने काँग्रेस दशरथ भगत किंवा रमाकांत म्हात्रे यांची स्वीकृत नगरसवेक पदावर वर्णी लागण्याची शक्यता आहे.
विद्यमान ८९ नगरसवेकांची पाच वर्षांची मुदत ८ मे रोजी संपुष्टात येत आहे. त्यामुळे ९ मे रोजी महापौर पदासाठी निवडणूक होणार आहे. त्यासाठी कोकण विभागीय आयुक्त राधेश्याम मोपलवार रायगड जिल्हाधिकारी सुमंत गायकवाड यांना पिठासीन अधिकारी म्हणून नेमण्याची शक्यता आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली महापौर पदासाठी निवडणूक होणार आहे. आजी-माजी असे एकूण २०० नगरसेवक सध्या शहरात वावरत आहेत.