नगर व नाशिक जिल्ह्यांत पडणाऱ्या पावसामुळे गोदावरीच्या पात्रात येत असलेल्या पाण्यामुळे जायकवाडी जलाशयाच्या पाणीपातळीत एक मीटरने वाढ झाली आहे. शुक्रवारी दुपारी चारनंतर येणाऱ्या पाण्याचा ओघ पाहता जायकवाडीचा साठा ‘शून्य टक्क्या’वर (मृत साठा) येईल, असे जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. गेल्या दि. १ जूनपासून या धरणात १६०.७० दशलक्ष घनमीटर नवीन पाणी आले. मागील दोन दिवसांपासून सुरू असणारा पाण्याचा ओघ पाहता जायकवाडी जलाशय मृतसाठय़ातून लवकर बाहेर पडेल. जायकवाडीत शून्य टक्के पाणी असेल तेव्हा नगर व नाशिक जिल्ह्यांतील धरणे किमान ११ व कमाल ९९ टक्के भरल्याचे अहवाल आहेत.
तीव्र दुष्काळानंतर जायकवाडीच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाला असला तरी त्यात फारसा जोर नव्हता. सर्वसाधारणपणे परतीच्या पावसाने जायकवाडीत मोठय़ा प्रमाणात पाणी येते. पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाला की, कालव्याव्दारे पाणी वळविले जाते. परिणामी जायकवाडी जलाशयात तसे पाणी येत नाही. मात्र, धरणांच्या दरवाजांचे प्रचलन व पाणीपातळी लक्षात घेता दारणा धरणातून ७ हजार ७७६ क्युसेक वेगाने गोदावरी पात्रात प्रवाह सोडण्यात आला. तसेच भंडारदरा धरणातूनही येणाऱ्या पाण्याचा वेग वाढू शकतो. शुक्रवारी दुपारी चापर्यंत जायकवाडी शून्य टक्क्यावर येण्यास ४ दलघमी पाण्याची आवश्यकता होती. रात्रीतून तेवढे पाणी येऊ शकेल. त्यामुळे शनिवारी धरण शून्य टक्क्यावर असेल.
दरम्यान, जायकवाडी जलाशयात किती पाणीसाठा असावा, या अनुषंगाने सुरू असणाऱ्या चर्चाही रंगल्या आहेत. स्वत: मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लक्ष घालण्याचे आश्वासन दिल्याने काही धोरणात्मक निर्णय लवकरच होतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे.