News Flash

पाण्याचे भांडण आता गावपातळीवर

पाण्याच्या प्रश्नावर राज्यात प्रादेशिक स्तरावर तसेच जिल्ह्याजिल्ह्यात सुरू असणारे वाद आता थेट गावपातळीपर्यंत येऊन पोहचले आहेत. आपल्या गावातून दुस-या गावात पाणी नेऊ नये म्हणून निब्रळमधील

| December 3, 2013 01:56 am

पाण्याच्या प्रश्नावर राज्यात प्रादेशिक स्तरावर तसेच जिल्ह्याजिल्ह्यात सुरू असणारे वाद आता थेट गावपातळीपर्यंत येऊन पोहचले आहेत. आपल्या गावातून दुस-या गावात पाणी नेऊ नये म्हणून निब्रळमधील काही शेतक-यांनी शेतीसाठी केलेली आपल्या गावच्या शिवारातील उपसा जलसिंचन योजनेची पाइपलाइनच उखडून फेकली. यासंदर्भात अगस्ती कारखान्याच्या एका संचालकासह निब्रळमधील दहा जणांविरुद्ध अकोले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
आंबड हे अकोले तालुक्यातील प्रवरा पट्टय़ात असणारे पण नदीच्या पाण्यापासून वंचित असणारे गाव. या गावातील संदीप भोर, रामदास भोर आदी चार शेतक-यांनी आंबडमधील आपली शेती बागायत करण्याच्या उद्देशाने प्रवरा नदीकाठी असणा-या निब्रळ गावातील गजानन डावरे यांची विहिर व विहिरीतील पाण्याचा हक्क जानेवारी महिन्यात विकत घेतला. या विहिरीवरून त्यांनी सुमारे १७ हजार फूट लांबीची पाइपलाइन आपल्या शेतापर्यंत केली. त्यासाठी या शेतक-यांनी ३० ते ३५ लाख रुपये खर्च केला.
विशेष म्हणजे ही विहीर प्रवरा नदीच्या पलीकडच्या तीरावर आहे. त्यामुळे या शेतक-यांनी प्रवरा नदीतून डोंगळा पाइप टाकून पाणीयोजना पूर्ण केली, मात्र त्यांच्या या योजनेस निब्रळमधील गंगाधर नलावडे, सत्यवान डावरे आदी काही शेतक-यांनी हरकत घेतली. आमचे गावातून वाहणा-या नदीतून तुम्हाला पाणी नेऊ दिले जाणार नाही असे या शेतक-यांना बजावले. आम्ही नदीतून नाही तर विहिरीतून पाण्याचे हक्क घेऊन योजना पूर्ण केली असल्याचे भोर व अन्य शेतक-यांनी समजावून सांगितले, पण त्याचा उपयोग झाला नाही. चार दिवसांपूर्वी निब्रळमधील या शेतक-यांनी रात्रीच्या वेळी जेसीबीच्या साहाय्याने सुमारे आठशे फूट लांबीची सायफन उखडून टाकत सुमारे साडेतीन लाख रुपयांचे नुकसान केले. त्यासंदर्भात विचारणा करण्यास आंबडमधील शेतकरी गेले असता त्यांना शिवीगाळ तसेच धक्काबुक्की करण्यात आली. संदीप भोर यांनी यासंदर्भात दिलेल्या तक्रारीवरून गणपत नलावडे, राजेंद्र डावरे आदी दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अकोले तालुक्यात पाण्याच्या मक्तेदारीविरुद्ध मोठे आंदोलन झाले होते. त्यात प्रवरा खो-यातील शेतकरी आघाडीवर होते. नदीच्या उगमापासून संगमापर्यंत सर्वांचाच नदीचे पाण्यावर हक्क असल्याचे सांगितले जात होते. त्यातूनच भंडारद-याच्या पाण्याचे फेरवाटप करावे लागले. त्याच प्रवरा खो-यातील शेतकरी शेजारच्या गावात पाणी न्यायला विरोध करू लागल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2013 1:56 am

Web Title: now water dispute at the village level
Next Stories
1 आमदार-खासदारच आमनेसामने
2 ‘अगस्तीने आधी अर्बनचे थकीत कर्ज फेडावे’
3 मंडलिक यांनी पुराव्यासह स्पष्टीकरण करावे, अन्यथा न्यायालयाचा दरवाजा ठोठावू- मुरकुंबी
Just Now!
X