‘व्हॉट्स अॅप’, ‘फेसबुक’ आदींच्या माध्यमातून आपल्या मुलांची शाळेतील प्रगती आणि रोजच्या रोज वर्गात होणाऱ्या घडामोडी जाणून घेण्याची पद्धत मुंबईतील पालकांमध्ये सध्या कमालीची लोकप्रिय होऊ लागली आहे. पालकही मोठय़ा उत्साहाने या समुहांमध्ये (ग्रुप्स) सामील होताना दिसत आहेत. त्यामुळे मुलांच्या दैनंदिनी (कॅलेंडर्स)ऐवजी या नव्या तंत्राचा वापर वाढू लागला आहे.
व्हॉट्स अॅप किंवा फेसबुकवरील या समुहांमुळे शिक्षक, इतर पालक यांच्याशी कायम संपर्कात राहून आपल्या मुलांच्या शैक्षणिक प्रगतीचा तसेच वर्गात होणाऱ्या दैनंदिन घडामोडींचा आढावा घेणे पालकांना शक्य होत आहे त्यातल्या त्यात व्हॉट्स अॅप तर पालकांमध्ये कमालीचे लोकप्रिय असल्याचे दिसून येत आहे. अनेक शाळाच पालकांनी व्हॉट्स अॅपवर आपापले समुह तयार करण्यास प्रोत्साहन देत आहेत.मुलाच्या वर्गात होणाऱ्या दैनंदिन घडामोडी, असाईनमेंट्स, अभ्यासक्रम, शाळेच्या व्यवस्थापनासंदर्भात असलेल्या अडचणी, तक्रारी, शाळाबसच्या वेळेतील बदल यांची चर्चा या माध्यमातून करणे पालकांना सोयीचे जाते. याचा सर्वाधिक फायदा अर्थातच नोकरदार पालकांना होतो. दररोज मुलांना शाळेत ने-आण करणे या पालकांना शक्य नसते. त्यामुळे, शिक्षकांशी चर्चा करण्याची वेळही या पालकांवर क्वचितच येते. अशा परिस्थितीत वर्गात दररोज होणाऱ्या घडामोडी या माहिती करून घेण्यासाठी व्हॉट्स अॅपचा पालकांना चांगलाच फायदा होत आहे.काही पालकांच्या व्हॉट्स अॅप समुहांमध्ये शिक्षकही सहभागी असतात. त्यामुळे, दररोजच्या घडामोडींची माहिती शिक्षकांशी व्हॉट्स अॅपवर घेणेही पालकांना शक्य होते. ‘वर्गात काय शिकविले जाते याचा अंदाज पालकांना केवळ ‘ओपन हाऊस’ बैठकांमध्ये किंवा महिन्याच्या शेवटी मुलांमार्फत शिक्षकांनी पाठविलेल्या अभ्यासक्रमाच्या यादीवरून घ्यावा लागायचा. आता व्हॉट्स अॅपमुळे घरबसल्या आपल्या सेलफोनवर ही माहिती घेता येते,’ अशी प्रतिक्रिया डॉन बॉस्कोच्या एका पालकाने व्यक्त केली.
शाळेच्या वेळापत्रकात आयत्यावेळेस काही बदल असल्यास त्याची माहिती देण्यासाठीही व्हॉट्स अॅपचा उपयोग शाळा करू लागल्या आहेत. जुहूच्या ‘उत्पल संघवी शाळे’त पालकांना एकत्रित पद्धतीने लघुसंदेश पाठविले जातात. तर बोरीवलीच्या डॉन बॉस्को शाळेत शिक्षक पालक संघटनेची स्थापना झाल्यानंतर लगेचच पालकांच्या प्रतिनिधींना व्हॉट्स अॅपवर पालकांचा समुह करण्यास सांगण्यात आले. या शिवाय एका विशिष्ट संकेतस्थळामार्फत पालकांना आयत्यावेळेस होणारे बदल किंवा घडामोडींची माहिती शाळा देते. शाळाच नव्हे तर प्ले ग्रुप, नर्सरी चालविणाऱ्या ‘ट्री हाऊस’सारख्या संस्थाही फेसबुक आणि व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून सतत पालकांच्या संपर्कात राहण्याचा मार्ग चोखाळत आहेत.आमच्यासारख्या नोकदार पालकांना व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून मुलांच्या वर्गातील घडामोडींवर लक्ष ठेवता येते. कारण, शिक्षकांची वरचेवर भेट घेणे आम्हाला शक्य होत नाही, असे वाशी येथे राहणाऱ्या नीरजा बर्वे यांनी सांगितले.