News Flash

बाल्या नाचात महिलांचाही ठेका

कोकणातील बाल्या नाच हा प्रसिद्ध असून भल्या भल्यांना थिरकायला लावणाऱ्या या नाचाचे खरे महत्त्व गणेशोत्सवाच्या काळात अधिक. सध्या पारंपरिक पद्धतीने गाण्यांवर होणाऱ्या या नाचात काळानुरूप

| September 4, 2014 07:09 am

कोकणातील बाल्या नाच हा प्रसिद्ध असून भल्या भल्यांना थिरकायला लावणाऱ्या या नाचाचे खरे महत्त्व गणेशोत्सवाच्या काळात अधिक. सध्या पारंपरिक पद्धतीने गाण्यांवर होणाऱ्या या नाचात काळानुरूप बदल झाला आहे. आता बाल्या नाचाच्या स्पर्धा भरवून शक्ती व तुरेवाले अशा दोन संघांमध्ये नाच व गाण्याच्या स्पर्धा भरविण्यात येत आहेत. खोपटे गावातील पाटीलपाडय़ातील शिवकृपा गौरा मंडळाच्या वतीने या स्पर्धाचे आयोजन केले जाते.
‘गणा धाव रे गणा पाव रे तुझ्या प्रेमाचे किती गुण गाऊ रे तू दर्शन आम्हाला दावरे’ हे गाणे तर बाल्या नाचासाठी प्रसिद्ध आहे. बाल्या नाच हा ढोलकीच्या तालावर उडत्या चाली धरून गायल्या जाणाऱ्या गाण्यामुळे प्रसिद्ध झाला आहे. गेल्या अनेक वर्षांची परंपरा असलेल्या या नाचाला गणेशोत्सवातील करमणुकीचे साधन म्हणून पाहिले जात होते. मात्र सध्या यात बदल झाला आहे. या नाचातही आता स्पर्धा आली आहे. या स्पर्धेसाठी दोन संघ असतात. यांपैकी एक शक्तीवाले तर दुसरा संघ तुरेवाले म्हणून आपली कला सादर करतात. त्याच प्रमाणे पूर्वीच्या बाल्या नाचासाठी पारंपरिक गीतांवरच नाच केला जात होता. तर आता सध्याच्या हिंदी किंवा मराठी चित्रपटांतील प्रसिद्ध झालेल्या गाण्यांच्या चालींचा आधार घेऊन गाणी म्हटली जात आहेत. या गाण्यांच्या ध्वनिमुद्रिका तयार करून त्यांची बाजारातून विक्री केली जात असून स्पर्धेसाठी विविध नाच मंडळे तयार करण्यात आलेली आहेत. त्याच प्रमाणे या नाचातील नेहमीचा अर्धी पँट आणि गळ्याला रुमाल हा पोशाख जाऊन फुल पँट आणि रंगीबेरंगी पोशाखाने त्याची जागा घेतलेली आहे. त्याच प्रमाणे या नाचांच्या स्पर्धेत आता सध्य:स्थितीचा आढावा घेणारी व समाजात जनजागृती करणारी गीते सादर केली जातात. यामध्ये स्त्री-भ्रुणहत्त्येविरोधी, महागाई, बेकारीविरोधी तसेच समाजातील अनिष्ट रूढी परंपरेविरोधात जागृती करणारी गीते सादर केली जातात.
बाल्या नाच हा पुरुषांचीच मक्तेदारी असा समज गेली अनेक वर्षे होता मात्र यामध्ये आता सर्व क्षेत्रांप्रमाणे महिलांनीही आघाडी घेतली असून रायगड जिल्हा व कोकणातील अनेक विभागांतून महिलांची पथके या स्पर्धामध्ये सहभागी होत आहेत. इतकेच नव्हे तर शक्ती व तुरेवाले या नाचांच्या स्पर्धेत पुरुषांना सडेतोड आव्हान देत स्पर्धा करून विजयी होत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2014 7:09 am

Web Title: now womens also perform in balya dance
टॅग : Marathi
Next Stories
1 बाप्पाच्या विसर्जनातदेखील खड्डय़ांचे विघ्न
2 पनवेलचे चौक वाहतूक कोंडीचे केंद्र
3 सीआयएसएफचा जवान आठवडय़ानंतरही बेपत्ता
Just Now!
X