पंढरपुरात येत्या ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारीपर्यंत होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनासाठी सोलापूर जिल्हा नियोजन समितीने २५ लाख तर विविध संस्थांकडून ७५ लाख असा मिळून एक कोटीचा निधी जमा झाला आहे. राज्य शासनाकडून दिला जाणारा निधी मराठी नाटय़ परिषदेच्या मध्यवर्ती शाखेकडे जमा होणार आहे. तथापि, या नाटय़ संमेलनाच्या नियोजनात स्थानिक राष्ट्रवादीच्या नेत्यांना डावलण्यात आल्याचे दिसून येते.
दरम्यान, या नाटय़ संमेलनाच्या तयारीला वेग आला असून यासंदर्भात संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा पंढरपूरचे अपक्ष आमदार भारत भालके यांनी एका बैठकीत नाटय़ संमेलनाच्या तयारीचा आढावा घेतला. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे या संमेलनाचे उद्घाटक असून याशिवाय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सांस्कृतिक मंत्री संजय देवतळे, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, जलसंपदामंत्री सुनील तटकरे, दुग्धविकासमंत्री मधुकरराव चव्हाण, सोलापूरचे पालकमंत्री दिलीप सोपल, विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे आदींना आमंत्रित करण्यात आले आहे.
पंढरपूरच्या चंद्रभागा एसटी बस स्थानकाच्या मैदानावर होणाऱ्या या नाटय़ संमेलनासाठी भव्य शामियाना उभारण्यात येत आहे. संमेलनात सर्व पक्षांच्या मंडळींचा सहभाग घेतला जात असला तरी राष्ट्रवादीचे स्थानिक नेते तथा एसटी महामंडळाचे माजी अध्यक्ष सुधाकर परिचारक व त्यांचे पुतणे प्रशांत परिचारक यांना या नाटय़ संमेलनाच्या  नियोजनापासून दूर ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले. यासंदर्भात बोलताना सुधाकर परिचारक यांनी, संमेलनाच्या नियोजनासाठी आतापर्यंत झालेल्या बैठकांना आपणास बोलावण्यात आले नसल्याचे स्पष्ट केले. नाटय़ संमेलनाचे स्वागताध्यक्ष आमदार भालके व कार्याध्यक्ष विनोद महाडिक हे दोघेही परिचारक यांचे विरोधक समजले जातात.