04 July 2020

News Flash

चौकशीत दोषी आढळली तरच ‘एसएनडीएल’वर कारवाई – बावनकुळे

शहरातील खासगी वीज वितरण कंपनी ‘एसएनडीएल’ने काही अटींचे उल्लंघन केल्याची तक्रार आली असली तरी चौकशीअंती दोषी आढळल्यानंतरच कारवाई केली जाईल,

| January 14, 2015 08:01 am

शहरातील खासगी वीज वितरण कंपनी ‘एसएनडीएल’ने काही अटींचे उल्लंघन केल्याची तक्रार आली असली तरी चौकशीअंती दोषी आढळल्यानंतरच कारवाई केली जाईल, अशी माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
शहरातील सिव्हिल लाईन्स, गांधीबाग आणि काँग्रेसनगर या तीन भागात वीज वितरीत करण्याचा करार तत्कालीन आघाडी सरकारने एसएनडीएल कंपनीसोबत (तत्कालीन स्पॅन्को कंपनी) केला. कंपनीने वीज पुरवठा करताना काही अटींचे उल्लंघन केले असल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. दरम्यान, या कराराच्या प्रती शहरातील नगरसेवक आणि आमदारांना दिल्या जाणार आहे. त्या करारातील नेमक्या कोणत्या अटींचे कंपनीने उल्लंघन केले, याची माहिती नगरसेवकांकडून मागवण्यात येईल. यानंतर एक अहवाल तयार करून तो त्रयस्थ संस्थेकडे पाठवला जाईल. ही संस्था आपला स्वतंत्र अहवाल तयार करेल. यात संबंधित कंपनी दोषी असल्याचे आढळून आल्यास त्यानंतर संबंधित कंपनीविरोधात कारवाईचा विचार केला जाईल, असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
वीज वितरण कंपनीच्या चंद्रपूर आणि नाशिक येथून काही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्या तक्रारींवर खातेनिहाय चौकशी सुरू असल्याचे सांगून बावनकुळे म्हणाले, राज्यातील संपूर्ण ग्राहकांना कमी दरात व चोवीस तास वीज कशी उपलब्ध होईल यासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. यामध्ये कोळसा वाहतुकीवर होणारा खर्च कमी करणे, वीज हानी कमी करणे, कर्जाचे ओझे कमी करणे आणि चांगल्या कोळशाचा पुरवठा करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. ज्या विभागात ५८ पैशापेक्षा कमी वसुली आहे, तेथे भारनियमन केले जाणार आहे. परंतु जेथे ५८ पैशापेक्षा अधिकची वसुली होते, तेथे भारनियमन केले जाणार नाही. शेतकऱ्यांना सोलर पंप देण्याची शासनाची योजना आहे. त्यासाठी २० जानेवारी पूर्वी एक ‘सोलर योजना’ तयार करण्यात येईल. या योजनेवर ३० जानेवारीपर्यंत सूचना मागवण्यात येतील. यानंतर एक अहवाल तयार करून तो मंजुरीसाठी मंत्रिमंडळापुढे ठेवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2015 8:01 am

Web Title: nsdl in nagpur
टॅग Electricity,Nagpur
Next Stories
1 उपराजधानीला गरज चांगल्या कलादालनांची!
2 बिल्डर व खासगी रुग्णालयांकडून बांधकाम नियमांचे सर्रास उल्लंघन
3 मांजाबद्दलचे धोरण सात दिवसांत ठरवा
Just Now!
X