राज्य सरकारचा २०११-१२चा ‘उत्कृष्ट रा. से. यो. एकक महाविद्यालय पुरस्कार’ येथील कमलताई जामकर महिला महाविद्यालयास मिळाला.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे, राज्यमंत्री डी. पी. सावंत यांच्या हस्ते नूतन विद्यामंदिर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हेमंत जामकर यांनी, तर राज्यस्तरीय उत्कृष्ट रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी म्हणून प्रा. डॉ. देविदास भगवान यांनी मुंबईत हे पुरस्कार स्वीकारले. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून उद्बोधन शिबिर, युवती कार्यशाळा, वृक्षारोपण, आरोग्य तपासणी शिबिरे, ग्रामीण भागात विशेष रा.से.यो. शिबिराचे आयोजन महाविद्यालयातर्फे करण्यात येते. अभ्यासक्रमासह स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, पल्स पोलिओ लसीकरण, रक्तदान शिबिर, कैद्यांसाठी ग्रंथ पुरविणे, ग्रामस्वच्छतेबरोबरच ग्रामीण महिला व मुलींबाबत जाणीवजागृती करुन प्रसंगी काही सर्वेक्षण करण्यात येते. महाविद्यालयाची शैक्षणिक प्रगती व गुणवत्ता लक्षात घेता २००९-१० या वर्षांचा निर्मल महाविद्यालय पुरस्कार महाविद्यालयास देण्यात आला होता. राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत राबविलेल्या उपक्रमांची नोंद घेत सरकारने २०११-१२चा उत्कृष्ट रा.से.यो. एकक महाविद्यालय म्हणून स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव केला.