पूर्वीच्या तुलनेत आता विवाह नोंदणी मोठय़ा प्रमाणात होत असून या वर्षी ऑक्टोबर महिन्यात चंद्रपूर जिल्हय़ात १४० विवाह नोंदणी झाली आहे. येत्या काळात हा आकडा वाढण्याची शक्यता येथील सहायक दुय्यम निबंधक कार्यालयाने वर्तवली आहे.

जिल्हय़ात मोठय़ा प्रमाणात विवाह होतात मग तो जातीय असो वा आंतरजातीय विशेषत: यात प्रेमविवाहाचाही समावेश आहे. समाजात आपापल्या धर्म कायद्यानुसार विवाह करण्यात येतो. विवाहात नातेवाईकांपासून तर समाजातील अनेक लोकांना बोलवण्यात येतो व त्यांच्या साक्षीने विवाह करण्यात येते. मात्र आज तरुण पिढी मोठय़ा प्रमाणात शिक्षण घेत आहेत त्यामुळे त्यांना कायद्याची माहिती आहे. म्हणूनच विवाह धर्माच्या परंपरेनुसार झाला असला तरी विवाहितांनी आता विवाह नोंदणीला प्राधान्य दिले आहे. धर्मपरंपरेनुसार तर विवाह होतोच त्यानंतर विवाह नोंदणी करून याला कायद्याची मोहरही लावण्यात येत आहे. जिल्हय़ात ही दरवर्षी मोठय़ा प्रमाणात विविध जाती धर्माच्या विवाह धर्मपरंपरेनुसार समाजातील लोकांना एकत्र बोलावून पार पडतात. असे असले तरी आता मात्र युवक-युवती विवाह नोंदणी करून कायद्यानुसार मान्यताही प्राप्त करून घेत आहेत.
याविषयी काही युवकांना विचारले असता ते म्हणाले, जाती धर्मानुसार विवाह करण्यास त्यांची हरकत नाही. मात्र, अशा विवाहात पैसा मोठय़ा प्रमाणात खर्च होतो आणि घरच्या मंडळींनी दगदग करावी लागते त्यामुळे नोंदणी विवाह करून नंतर फक्त नातेवाईक व मित्रमंडळींना छोटीशी मेजवानी देण्यात त्यांना रस असल्याचे काही तरुणांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
चंद्रपूर जिल्हय़ात मागील पाच वर्षांत म्हणजे २०१० ते चालू वर्षी ऑक्टोबर २०१४ पयर्ंत ६५१ जोडप्यांनी विवाह नोंदणी केली आहे. यात २०१० मध्ये ५१ जोडप्यांनी विवाह नोंदणी केली आहे तर २०११ मध्ये ७८, २०१२ मध्ये २२९, २०१३ मध्ये १५३ तर चालू वर्षी ऑक्टोबर महिन्यापयर्ंत १४० विवाह नोंदणी करण्यात आली आहे. विवाह नोंदणी करण्याकरिता महिन्याभरापूर्वी अर्ज सादर करावा लागतो व एका महिन्यानंतर कार्यालयात जाऊन आवश्यक त्या अटी पूर्ण करून नोंदणी विवाह करता येतो.
पूर्वीच्या तुलनेत आता विवाह नोंदणीचे प्रमाण वाढत असून येत्या काळात हा आकडा वाढणार असल्याची शक्यता येथील सहा. दुय्यम निबंधक कार्यालयाने वर्तवली आहे. युवकांनी जाती धर्मपरंपरेनुसार विवाह करावा आणि नंतर विवाह नोंदणी करावी, असे आवाहन या कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.